कोरोनाच्या सावटात रमजान ईद अत्यंत साधेपणाने साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:02 IST2021-05-15T04:02:22+5:302021-05-15T04:02:22+5:30
औरंगाबाद : कडक उन्हाळ्यात तीस दिवस उपवास ठेवल्यानंतर मुस्लिम बांधवांनी शुक्रवारी अत्यंत साधेपणाने ईद-उल्-फित्र साजरी केली. ईदची विशेष नमाज ...

कोरोनाच्या सावटात रमजान ईद अत्यंत साधेपणाने साजरी
औरंगाबाद : कडक उन्हाळ्यात तीस दिवस उपवास ठेवल्यानंतर मुस्लिम बांधवांनी शुक्रवारी अत्यंत साधेपणाने ईद-उल्-फित्र साजरी केली. ईदची विशेष नमाज घरातच अदा करण्यात आली. प्रशासनाने कोरोनासंदर्भात ठरवून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले. शहरातील पाच प्रमुख ईदगाहमध्ये दुसऱ्यावर्षीही ईदची नमाज झाली नाही.
मागीलवर्षी केंद्र शासनाने लावलेल्या कडक लॉकडाऊनमुळे मुस्लिम बांधवांना घराबाहेर पडता येत नव्हते. ३० देवास घरातच नमाज, इबादत करून ईद साजरी केली होती. यंदाही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रमजान महिन्याचे आगमन झाले. मागीलवर्षीच्या तुलनेत सकाळी आणि सायंकाळी जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी प्रशासनाने मुभा दिली होती. गुरुवारी सायंकाळी चंद्रदर्शन झाल्यानंतर शुक्रवारी सकाळी मुस्लिम बांधवांनी ईदची विशेष नमाज अदा केली. शहरातील मशिदीमध्ये पाचपेक्षा अधिक नागरिकांना परवानगी देण्यात आली नाही. ईदच्या नमाजनंतर मुस्लिम बांधवांनी कब्रस्तानात जाऊन आपल्या पूर्वजांच्या कबरीवर पुष्प अर्पण केले. कोरोना नियमांचे पालन करीत हस्तांदोलन आणि गळाभेट टाळण्यात आली. नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
ईदची खरेदी नाही
रमजान ईदला गरीब आणि श्रीमंत प्रत्येकजण सर्वच नवीन कपडे खरेदी करतात. मागीलवर्षी नागरिकांनी जुन्या कपड्यांवरच ईद साजरी केली. यंदाही ९० टक्के नागरिकांनी जुन्या कपड्यांवरच ईद साजरी केली. केवळ लहान मुलांच्या हट्टापायी, जिथे मिळतील तेथून त्यांना कपडे विकत आणण्यात आले.
कोरोनात मरण पावलेल्या कुटुंबांमध्ये ईद...
कोरोनामुळे ज्या कुटुंबातील सदस्य मरण पावला, त्या कुटुंबावर अगोदरच दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शहरातील फारुकी कुटुंबीयांमध्ये चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण फारुकी कुटुंबामध्ये आज ईद साजरी झाली नाही, असे त्यांच्या कुटुंबातील सदस्य खालेद फारुकी यांनी सांगितले. शहरात अशी अनेक कुटुंबे आहेत, ज्यांच्या घरातील एक तरी कर्ता पुरुष मरण पावला. त्या कुटुंबांमध्ये आज ईद साजरी झाली नाही.
शिरखुर्म्याची फक्त औपचारिकता
रमजान ईदचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक घरात शिरखुर्मा तयार करण्यात येतो. पण यावेळी कोरोनामुळे नागरिकांनी अत्यंत औपचारिक स्वरूपात शिरखुर्मा तयार करण्याचा निर्णय घेतला. दरवर्षीच्या तुलनेत पन्नास टक्केच दूध नागरिकांनी खरेदी केले. रात्री आठनंतर पोलिसांनी दूध विक्रीवर बंदी आणली. त्यामुळे प्रत्येक दुकानदाराकडील किमान पाचशे ते सहाशे लिटर दूध खराब झाले.