यंदा रमजान ईद घरातच साजरी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:05 IST2021-05-13T04:05:16+5:302021-05-13T04:05:16+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यात रमजान ईद साजरी करण्याबाबत राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे नागरिकांनी पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण ...

यंदा रमजान ईद घरातच साजरी करा
औरंगाबाद : जिल्ह्यात रमजान ईद साजरी करण्याबाबत राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे नागरिकांनी पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बुधवारी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर आयोजित धर्मगुरूंच्या बैठकीस पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, जि. प. सीईओ डॉ. मंगेश गोंदावले, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, मनपा सहायक आयुक्त नंदकिशोर भोंबे, शहरातील मुस्लिम धर्मगुरूंची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या काही प्रमाणात नियंत्रणात येत आहे. यापूर्वीचे विविध सण, उत्सव साध्या पध्दतीने साजरे झाले आहेत. त्यामुळे ईदनिमित्त बाहेर एकत्र नमाज पठण करण्यासाठी किंवा गाठीभेटीसाठी घराबाहेर न पडू नये. घरातच ईद साजरी करावी.
पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता म्हणाले की, रमजानच्या पूर्ण महिन्यामध्ये सर्व मुस्लिम बांधवांनी कोरोना प्रतिबंधासाठी नियम पाळून सहकार्य केले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर राजकीय, धार्मिक कार्यक्रमांवर बंदी आहे. पोलीस प्रशासन २४ तास कर्तव्यावर असून सर्वांची सहकार्याची अपेक्षा आहे.
माजी महापौर रशीदमामू म्हणाले, ईद साजरी करण्याबाबत सर्व मुस्लिम बांधवांचे सहकार्य राहील. कोरोना महामारी दूर व्हावी यासाठी दुवा मागितली जाईल.
अब्दुल रशिद मदनी यांनी ईद साजरी करण्याबाबतच्या राज्य शासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करून ईद साजरी केली जाईल असे आश्वासन दिले.
नमाजासाठी सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊ नका
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी मुस्लिम बांधवांनी नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी मशिदीमध्ये अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊ नये. सर्व धार्मिक कार्यक्रम घरातच साजरे करावे. नमाज पठणाकरीता मशिदीत तसेच मोकळ्या जागेत एकत्र येऊ नये. ठराविक वेळेव्यतिरिक्त बाजारामध्ये सामान खरेदीकरिता गर्दी करु नये. रात्रीची संचारबंदी असल्यामुळे या कालावधीत फेरीवाल्यांनी रस्त्यावर स्टॉल लावू नयेत. नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये. मिरवणुका, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक अथवा राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करू नये. धार्मिक स्थळे बंद असल्याने मुस्लिम समाजातील धर्मगुरू, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि स्वयंसेवी संस्थांनी रमजान ईद साधेपणाने साजरी करण्यासाठी जनजागृती करावी. सोशल डिस्टन्सिंग, मास्क व सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन करावे.