घरोघरी प्रतिमापूजन करत भगवान परशुराम जन्मोत्सव साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:02 IST2021-05-15T04:02:02+5:302021-05-15T04:02:02+5:30
औरंगाबाद : भगवान विष्णूचे सहावे अवतार भगवान परशुराम जन्मोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. घरोघरी भगवंतांच्या प्रतिमेचे पूजन ...

घरोघरी प्रतिमापूजन करत भगवान परशुराम जन्मोत्सव साजरा
औरंगाबाद : भगवान विष्णूचे सहावे अवतार भगवान परशुराम जन्मोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. घरोघरी भगवंतांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. समाजातील गरीब कुटुंबाला धान्याचे वाटप व महा मृत्युंजय जप ऑनलाइन करण्यात आला.
कोरोना महामारीमुळे ब्राह्मण समाजाने आपली नैतिक जबाबदारी पार पाडत घरातच भगवान परशुराम जन्मोत्सव साजरा केला. पहाटे घरासमोर सडा, रांगोळी काढण्यात आली. त्यानंतर देवघरात भगवान परशुरामाची प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विधिवत पूजा, आरती व नैवेद्य दाखविण्यात आला. अक्षय्य तृतीया असल्याने घरोघरी आमरसचा बेत आखण्यात आला होता. सायंकाळीही घरासमोर सडा रांगोळी काढण्यात आली होती. घरात व समोरील बाजूस लावलेले पणत्या, दिव्यांनी घर उजळून निघाले होते. यावेळी भगवान परशुरामांचा घरोघरी जयजयकार करत. कोरोना महामारीतून सर्व जगाची सुटका कर, असे साकडे भगवंतांकडे करण्यात आले.
तत्पूर्वी औरंगपुरा येथील भगवान परशुराम चौकातील स्तंभाला फुलांनी आकर्षकरीत्या सजविण्यात आले होते. येथे भगवान परशुरामांची प्रतिमा ठेवण्यात आली होती.
त्याचे विधिवत पूजन ब्राह्मण समन्वय समितीने केले. समितीचे दिवंगत माजी अध्यक्ष अनिल पैठणकर यांचे सर्वानी स्मरण केले त्यांच्या प्रतिमेलाही हार अर्पण करण्यात आला. कवी त्र्यंबक जोशी रचित आरतीचे पोस्टर येथे लावण्यात आले होते. बजाजनगर येथील भगवान परशुराम मंदिरात भगवंताच्या मूर्तीला मधुसूदन पांडे गुरुजी यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आले. सरकारी नियमाचे पालन करीत येथे मंदिरात चार जण उपस्थित होते. भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात आला नाही.
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने दुपारी ४ वाजता महामृत्यूजय मंत्राचा जप करण्यात आला. या ऑनलाईन मंत्र जपमध्ये समाजातील शेकडो स्त्री व पुरुषांनी सहभाग घेतला.
सिडकोतील सप्तपदी मंगल कार्यालय येथे सायंकाळी ब्रह्मसखी परिवारातर्फे समाजातील १०१ गरीब कुटुंबांना धान्याचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात दोन कुटुंब सहभागी झाले होते. बाकीच्या कुटुंबांना त्यांच्या घरी धान्य नेऊन देण्यात आले.
चौकट
स्तंभाचे पूजन
औरंगपुरा येथील परशुराम स्तंभाचे पूजन ब्राह्मण समन्वय समिती च्या वतीने करण्यात आले. यावेळी खा. भागवत कराड, संजय केणेकर, गोपाळ कुलकर्णी तसेच समितीचे आनंद तांदूळवाडीकर, मिलिंद दामोदरे, धनंजय पांडे, सुधीर नाईक, सचिन गाडे पाटील, विजया कुलकर्णी, आशिष सुरडकर, श्रुती काटे आदींची उपस्थिती होती. यावेळी ''जय परशुराम'' चा जयघोष करण्यात आला.