वाळूज महानगरात पोळा सण उत्साहात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 23:37 IST2019-08-30T23:37:51+5:302019-08-30T23:37:57+5:30
शेतकऱ्यांनी सजवलेल्या बैलांची मिरवणूक काढून तर नागरिकांनी प्रतिकात्मक बैलाचे पूजन करुन पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला.

वाळूज महानगरात पोळा सण उत्साहात साजरा
वाळूज महानगर : वाळूज महानगर परिसरात शुक्रवारी शेतकऱ्यांनी अंगावर झुली घालून व शिंगाला रंगीबेरंगी फुगे बांधून सजवलेल्या बैलांची मिरवणूक काढून तर नागरिकांनी प्रतिकात्मक बैलाचे पूजन करुन पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला.
वर्षभर शेतात राबणाºया बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणून पोळा हा सण ओळखला जातो. हा सण शेतकरी मोठ्या उत्साहाने साजरा करतात. श्रावण महिन्याच्या शेवटी येणाºया या सणाची शेतकऱ्यांमध्ये फार उत्सुकता असते.
एक दिवस आधीच बैलांच्या खांदे मळणीपासून या सणाला सुरुवात होते. त्यानंतर दुसºया दिवशी म्हणजे पोळ्याच्या दिवशी बैलांना आंघोळ घाजून साज श्रृंगार करुन ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक काढली जाते. त्यानंतर त्यांची पूजा करुन पूरण पोळीचा घास भरविला जातो.
वाळूज महानगर परिसरातील तीसगाव, वळदगाव, वाळूज, वडगाव, रांजगणाव, जोगेश्वरी, लांझी, पाटोदा, करोडी आदी भागात शुक्रवारी बैलांना बाशिंग, रंगीबेरंगी फुगे, तिलाडी, गोंडे बांधून अंगावर झुली घालून त्यांची ढोल-ताशाच्या गजरात गावातून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर पारंपारिक पद्धतीने बैलांची पूजा करुन त्यांना पूरणपोळीचा घास भरविण्यात आला. येथील वळदगाव, पाटोदा, वाळूज, तीसगाव येथे बैलांची मिरवणूक पहाण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती.