संवेदनशील केंद्रांवर सीसीटीव्हीची नजर
By Admin | Updated: September 24, 2014 01:05 IST2014-09-24T00:53:12+5:302014-09-24T01:05:01+5:30
सुनील कच्छवे, औरंगाबाद विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व नऊ मतदारसंघांमधील संवेदनशील मतदान केंद्रांवर सीसीटीव्हीची नजर असणार आहे.

संवेदनशील केंद्रांवर सीसीटीव्हीची नजर
सुनील कच्छवे, औरंगाबाद
विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व नऊ मतदारसंघांमधील संवेदनशील मतदान केंद्रांवर सीसीटीव्हीची नजर असणार आहे. याशिवाय काही केंद्रांवरील मतदान प्रक्रियेवर प्रत्यक्ष लक्ष ठेवता यावे यासाठी तेथील प्रत्येक हालचालीचे थेट प्रक्षेपणही केले जाणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी जिल्ह्यात ४४ संवेदनशील मतदान केंदे्र होती. यातील २० केंद्रे शहरात, तर उर्वरित २४ केंद्रे ग्रामीण भागात होती. विधानसभा निवडणुकीसाठी अद्याप संवेदनशील केंद्रे निश्चित झाली नसली तरी ही केंद्रे निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. संवेदनशील म्हणून निश्चित झालेल्या केंद्रांवर निवडणूक आयोगातर्फे सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. या केंद्रांवरील संपूर्ण प्रक्रिया कॅमेऱ्यामध्ये चित्रित होणार आहे. याशिवाय काही केंद्रांवर वेब कास्टिंगद्वारे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी आठ मतदान केंद्रांवर अशा प्रकारे वेब कास्टिंगचा प्रयोग करण्यात आला. मतदानाच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याद्वारे संबंधित केंद्रांवरील मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवले. याही काही निवडक केंद्रांवर हा प्रयोग केला जाणार असल्याचे उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत हदगल यांनी सांगितले.