भरती परीक्षेवर सीसीटीव्हीचा ‘वॉच’
By Admin | Updated: July 6, 2014 00:21 IST2014-07-06T00:04:27+5:302014-07-06T00:21:45+5:30
बीड: वाहनचालक व शिपाई पदासाठी रविवारी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेदरम्यान गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी सीसीटीव्हीचा वॉच राहणार आहे.

भरती परीक्षेवर सीसीटीव्हीचा ‘वॉच’
बीड: वाहनचालक व शिपाई पदासाठी रविवारी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेदरम्यान गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी सीसीटीव्हीचा वॉच राहणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अस्थापनेवरील विविध पदांसाठी सध्या भरती प्रक्रिया सुरू आहे. या अंतर्गत शिपाई व वाहनचालक पदांसाठी लेखी परीक्षा रविवारी घेण्यात येत आहे. लेखी परीक्षेदरम्यान ज्या उमेदवारांनी अर्ज भरला आहे त्याच्याऐवजी दुसराच विद्यार्थी परीक्षेला बसतो, परीक्षा सुरू असताना अनधिकृत व्यक्ती परीक्षा केंद्रामध्ये जातात. परीक्षा सुरू असताना मोबाईलसह इतर उपकरणांचा उपयोग करून गैरप्रकार केला जातो आदी तक्रारी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे आल्या होत्या. अशा प्रकारांना आळा बसावा व गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जावी, यासाठी परीक्षेदरम्यान पंधरापेक्षा अधिक सीसीटीव्हींची नजर बारा केंद्रावर राहणार आहे. शहरातील चंपावती माध्यमिक विद्यालय, भगवान माध्यमिक विद्यालय व गीता कन्या प्रशाला येथे वाहनचालक पदासाठी परीक्षा होणार आहे. येथे १ हजार ७९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
शहरातील मिलिया महाविद्यालय, संस्कार विद्यालय, गुरूकुल इंग्लिश स्कूल, शिवाजी विद्यालय, बलभीम महाविद्यालय, द्वारकादास मंत्री विद्यालय, छत्रपती शाहू विद्यालय, स्वा. सावरकर विद्यालय व डॉ. बापूजी साळुंखे माध्यमिक विद्यालय येथे शिपाई पदासाठी परीक्षा घेण्यात येणार आहेत.
या केंद्रांवर २ हजार ७१६ उमेदवार परीक्षा देणार आहेत. भरती प्रक्रियेदरम्यान पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई
वाहन चालक व शिपाई संवर्गातील पदांसाठी तीन हजार ७९५ उमेदवार परीक्षा देणार आहेत. यापूर्वी परीक्षांबाबत तक्रारी येत असत. मात्र यावेळी परीक्षेदरम्यान कोणी काही गैरकृत्य करताना आढळून आल्यास किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्यास अशांवर कठोर कारवाई करणार असल्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी सांगितले.