सबंध शहरावर सीसीटीव्ही वॉच
By Admin | Updated: August 20, 2014 00:19 IST2014-08-19T23:52:44+5:302014-08-20T00:19:34+5:30
जिल्हा नियोजन समितीच्या नाविण्यपूर्ण योजनेअंतर्गत ४ कोटी ७ लाख रुपये खर्च करुन शहरातील ५० प्रमुख ठिकाणी १०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत़

सबंध शहरावर सीसीटीव्ही वॉच
नांदेड: शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता प्रत्येक घटनेवर लक्ष ठेवणे पोलिसांना शक्य नाही़ ही बाब लक्षात घेता ‘सेफ सिटी’ प्रकल्पाअंतर्गत सबंध शहरात सीसीटीव्ही कॅमेरा व ध्वनीक्षेपकाचे जाळे विणण्यात आले आहे़ पोलिस मुख्यालयात उभारण्यात आलेल्या अद्ययावत कक्षातून हालचाली टिपण्यात येणार असून गरजेनुसार ध्वनीक्षेपकावरुन सूचना देणे शक्य होणार आहे़
संवेदनशील शहर म्हणून नांदेडला ओळखले जाते़ एखादी घटना घडल्यास यामागची कारणे शोधताना पोलिस यंत्रणेला चांगलीच कसरत करावी लागते़ कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी, घराबाहेर पडताना नागरिकांना सुरक्षीत वाटावे यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या नाविण्यपूर्ण योजनेअंतर्गत ४ कोटी ७ लाख रुपये खर्च करुन शहरातील ५० प्रमुख ठिकाणी १०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत़
या प्रकल्पामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर लक्ष ठेवण्याबरोबरच विविध उत्सव, कार्यक्रम, गुन्हे व वाहतूक नियंत्रण, वाहतूक नियोजन तसेच अपातकालीन स्थितीत सूचना प्रसारणाचे काम प्रभावीपणे करण्यास मदत होईल़ शहरातील सर्व वाहतूक मार्ग, प्रमुख ठिकाणे, प्रार्थनास्थळे, शहरातील सर्व प्रवेश व निकास मार्ग, प्रशासकीय कार्यालये अशा ५० ठिकाणी अत्याधूनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन अत्यूच्च क्षमतेचे कॅमेरे बसविण्यात आलेत़ यात ७५ स्टँडबाय व २५ पीटीझेड कॅमेराचा समावेश आहे़
सीसीटीव्ही कॅमेरा प्रत्येक ठिकाणी पोहचू शकत नसल्याने पोलिस दलाच्या चार, मनपा व अनाधिकृत बांधकाम विभागाच्या एक अशा पाच वाहनांवर दोन्ही बाजूने प्रत्येकी एक कॅमेरा लावण्यात आला आहे़ त्यामुळे ज्या ठिकाणी हे वाहन जाईल, तेथील स्थितीची थेट पाहणी नियंत्रण कक्षात बसून करताना घटनास्थळी सूचनांचे प्रसरण करणे शक्य होणार आहे़ सर्व कॅमेराच्या ठिकाणी एकाच वेळी अथवा स्वतंत्रपणे सूचना देणारी ध्वनीक्षेपक यंत्रणा कार्यान्वीत केली आहे़ या प्रणालीमुळे नियंत्रण कक्षात बसून थेट दृश्य पाहून तेथूनच सूचना देता येतील़
महापालिका आणि पोलिस दलाची वाहने घटनास्थळापासून किती अंतरावर आहेत़ याचे निरीक्षण करुन घटनास्थळावर पोहोचण्यासाठी पोलिसांच्या २१ व महापालिकेच्या ४ वाहनांवर व्हेईकल ट्रॅकींग यंत्रणा विकसीत करण्यात आली आहे़ यामुळे वाहनांचे लोकेशन लक्षात येईल़ या प्रकल्पाच्या नेटवर्कसाठी मनपा स्वत:ची ओएफसी केबल वापरणार आहे़ आत्तापर्यंत ४५ किमी केबल टाकण्यात आली आहे़ शहरात झालेल्या अनेक चोरींचा तपास सीसीटीव्हीमुळे लावण्यात यंत्रणेला यश आले आहे़ तसेच सर्व अपघात थेट दृष्टीपथात आल्याने मदत पोहोचवण्याबरोबच नेमकी चूक कोणची हे पाहणे शक्य झाल्याने अपघताचे गुन्हे निकाली काढण्यात मदत होत आहे़ शिवाय अपघातग्रस्तांना वेळेत मदत मिळणार आहे़ (प्रतिनिधी)