मुंबईच्या धर्तीवर शहराच्या सीसीटीव्ही नेटवर्कला मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:36 IST2017-09-18T00:36:57+5:302017-09-18T00:36:57+5:30
औरंगाबादसाठी कमांड अॅण्ड कंट्रोलरूमसह सीसीटीव्ही नेटवर्कच्या प्रस्तावाला दोन दिवसांपूर्वीच मंजुरी देण्यात आली, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

मुंबईच्या धर्तीवर शहराच्या सीसीटीव्ही नेटवर्कला मंजुरी
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : स्मार्ट पोलिसिंगसोबतच तंत्रज्ञानाच्या मदतीने गुन्हे रोखता येतात आणि गुन्हे सिद्ध करण्याचे प्रमाण वाढविता येते. ही बाब लक्षात घेऊन औरंगाबादसाठी कमांड अॅण्ड कंट्रोलरूमसह सीसीटीव्ही नेटवर्कच्या प्रस्तावाला दोन दिवसांपूर्वीच मंजुरी देण्यात आली, अशी घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (दि.१७) येथे केली.
पुंडलिकनगर आणि वेदांतनगर पोलीस ठाण्याचे औपचारिक उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून खा.चंद्रकांत खैरे, आ. संजय शिरसाट, आ. अतुल सावे, आ. नारायण कुचे, आ. सुभाष झांबड, महापौर भगवान घडामोडे, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील ६५ पोलीस ठाण्यांच्या मंजुरीचे प्रस्ताव अनेक वर्षांपासून प्रलंबित होते. हे प्रस्ताव २०१४ मध्ये मंजूर केले. यासोबतच आणखी काही प्रस्ताव आलेले आहेत, ते मंजूर करण्याची कार्यवाही मेरिटनुसार केली जात आहे. पोलीस ठाण्यांच्या संख्येपेक्षा गुणात्मक वाढ होणे आवश्यक आहे. आम्ही तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला असून, राज्यातील सर्व पोलीस ठाणे सीसीटीएनएसच्या माध्यमातून आॅनलाइन केली.