आरक्षण कार्यालयावर सीसीटीव्हीची नजर

By Admin | Updated: September 21, 2014 00:35 IST2014-09-20T23:41:57+5:302014-09-21T00:35:25+5:30

औरंगाबाद : रेल्वेस्थानकावरील आरक्षण कार्यालयात अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले

CCTV eye on reservation office | आरक्षण कार्यालयावर सीसीटीव्हीची नजर

आरक्षण कार्यालयावर सीसीटीव्हीची नजर

औरंगाबाद : रेल्वेस्थानकावरील आरक्षण कार्यालयात अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे आरक्षण कार्यालयात वाढलेल्या दलालांवर यापुढे नियंत्रण येणार आहे. शिवाय या ठिकाणी तात्काळ तिकिटांसाठी होणारा गैरप्रकारही लवकरच बंद होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे आगामी काळात सुरक्षेबरोबर कार्यालयातील हालचालींवर लक्ष ठेवता येणार आहे.
मॉडेल रेल्वेस्थानकाच्या पहिल्या टप्प्यात भव्य इमारत बांधण्यात आली. या ठिकाणी कामकाजही सुरू झाले. रेल्वेस्थानकाच्या जुन्या इमारतीत ९ सीसीटीव्ही कार्यान्वित आहेत. मात्र, मॉडेल रेल्वेस्थानकाच्या नव्या इमारतीबरोबर आरक्षण कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले नाहीत. त्यामुळे या ठिकाणी सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असताना गेल्या अनेक दिवसांपासून दक्षिण मध्य रेल्वेचे त्याकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. त्यातही रेल्वेस्थानकाच्या आरक्षण कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधा नसल्याने गेल्या काही महिन्यांत अनेक समस्यांना सामोरे जाण्याची वेळ सर्वसामान्य प्रवाशांबरोबर कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर येत होती. वारंवार मागणी करूनही या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे या ठिकाणी तात्काळ तिकिटांसाठी होणारा गैरप्रकार रोखण्यासाठी व दलालांवर नियंत्रण आणताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. याशिवाय अधिकाऱ्यांनी नाहक त्रास देत आपण तिकिटासाठी अधिक पैसे घेत असल्याची तक्रार देण्यासाठी प्रवाशांवरही दबाब आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कार्यालयातील कर्मचाऱ्याने केला, तर या आरोपात काही तथ्य नसल्याचे सदर अधिकाऱ्याने म्हटले होते. अशा प्रकारे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून एकमेकांवर होणाऱ्या आरोपांत किती तथ्य आहे, हेदेखील सीसीटीव्ही कॅ मेऱ्यामुळे समोर येण्यासाठी महत्त्वाचे ठरू शकते. आरक्षण कार्यालयात शुक्रवारी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू करण्यात आल्यानंतर वायरिंगचे काम झाले. शनिवारी कार्यालयात तीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, लवकरच उर्वरित कॅमेरेही बसविण्यात येणार आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे आगामी काळात कार्यालयातील कामकाजावर लक्ष राहणार आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्यानंतर आता त्याद्वारे थेट नांदेड येथील विभागीय अधिकाऱ्यांनाही आरक्षण कार्यालयातील हालचालींवर लक्ष ठेवता येणार आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून आरक्षण कार्यालयाबरोबर कार्यालयाबाहेर लागणाऱ्या रांगांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. जवळपास ८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.

Web Title: CCTV eye on reservation office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.