लातूर शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसणार
By Admin | Updated: July 19, 2014 00:42 IST2014-07-19T00:00:56+5:302014-07-19T00:42:06+5:30
लातूर : नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत लातूर शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यासंबंधीच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या

लातूर शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसणार
लातूर : नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत लातूर शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यासंबंधीच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून, नियोजन समितीच्या बैठकीत त्याला मान्यता देण्यात आली आहे.
नियोजन समितीची बैठक शुक्रवारी डीपीडीसी सभागृहात झाली. याप्रसंगी पत्रकारांशी माहिती देताना पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, गतवर्षी १२५ कोटींचे आर्थिक नियोजन करण्यात आले होते. या आर्थिक वर्षासाठी १४५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या ४५ कोटींतील ६० टक्के निधी मंजूर झाला आहे. नोव्हेंबरपर्यंत हा निधी मिळेल. त्याअनुषंगाने सर्व विभाग प्रमुखांना विकास कामांच्या संदर्भात निर्देश देण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी टेंडर व अन्य प्रक्रिया पूर्ण करण्याचे सुचित करण्यात आले आहे. नियोजनाच्या आर्थिक तरतुदीतून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास मंजुरी नाही. परंतु, नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यासंबंधीचे सक्त निर्देश देण्यात आले आहेत.
५ कोटी रुपयांची तरतूद जनसुविधा योजनेसाठी करण्यात आली आहे. या योजनेतून प्राधान्याने स्मशानभूमीची कामे करण्यात येणार आहेत. ज्या गावात स्मशानभूमी नाही, त्या ठिकाणी स्मशानभूमी करण्यासाठी हा निधी खर्च केला जाईल. या योजनेतून यापूर्वी ५८ स्मशानभूमीचे काम पूर्ण झाले आहेत. आता ज्या गावात स्मशानभूमी नाही, तिथे हा खर्च करून स्मशानभूमीचे काम केले जाईल.
माती नमुने तपासणीसाठी ७५ रुपये खर्च होतो. हा खर्च एका नमुन्यासाठी होतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील माती नमुने मोफत तपासता यावेत, यासाठी नियोजनामध्ये तरतूद करण्यात आली असून, पेरणी, पाणी व अन्य योजनांचा आढावा घेण्यात आला आहे.
पत्रपरिषदेला राज्यमंत्री अमित देशमुख, आ. वैजनाथ शिंदे, राज्य साक्षरता परिषदेचे अध्यक्ष अॅड. त्र्यंबकदास झंवर, जि.प. अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. व्यंकट बेद्रे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन शर्मा, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, मनपा आयुक्त सुधाकर तेलंग, पोलिस अधीक्षक बी.जी. गायकर, अपर पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे आदींची उपस्थिती होती.
रेनवॉटर हार्वेस्टिंगची २२ कामे पूर्ण...
शासकीय कार्यालयाच्या इमारतीवर रेनवॉटर हार्वेस्टिंगची २२ कामे पूर्ण झाली आहेत. त्यामध्ये प्रशासकीय इमारत, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय, वैद्यकीय महाविद्यालय, रेणापूर तहसील, औसा न्यायालय, मुरुड पोलिस स्टेशन इमारत, महिला तंत्रनिकेतन, मुलींचे आयटीआय आदी इमारतींचा समावेश असून, अन्य इमारतींवरही रेनवॉटर हार्वेस्टिंगचे काम करण्यात येणार आहे.
सोयाबीन उगवले नसल्याच्या १८२ तक्रारी...
जिल्ह्यात अनेक ठिकाणी सोयाबीन उगवले नसल्याच्या १८२ तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. ९० टक्के बियाणे घरचे वापरूनही उगवले नाही. त्याचे पंचनामे करण्यात येत असून, आतापर्यंत २८ पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. राज्य शासनाकडून या शेतकऱ्यांना काही मदत मिळते का ते पाहिले जाईल.
औसा रस्त्यासाठी १५ कोटी मंजूर...
लातूर-औसा-लामजना रस्त्याला १५ कोटी रुपये मंजूर झाले असून, येडशी-लातूर, लातूर-नांदेड, लातूर-औरंगाबाद या रस्त्यांनाही टप्प्या-टप्प्याने निधी मंजूर होईल, असे राज्यमंत्री अमित देशमुख यांनी यावेळी सांगितले.
नियोजन केल्यास तीन दिवसांआड पाणी...
पाणी वाटपाचे नियोजन केल्यास तीन दिवसांआड पाणी देणे शक्य आहे. परंतु, मनपा व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून तसे नियोजन होणे अपेक्षित आहे. पाणी वितरण करताना लिकेजमुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. हे लिकेज शोधून पाणी बचत केल्यास तसेच नळाला तोट्या बसविल्यानंतर तीन दिवसांआड पाणी देणे शक्य असल्याचे पालकमंत्री यावेळी म्हणाले.
‘जीवनदायी’चा साडेचार हजार लोकांना लाभ...
राजीव गांधी जीवनदायी योजनेत लातूर जिल्ह्यातील ४५०० लोकांना लाभ देण्यात आला आहे. त्यापैकी बाहेर जिल्ह्यात जाऊन २६९९ सर्जरी करण्यात आल्या आहेत. ५ कोटी ९२ लाख रुपये यावर खर्च करण्यात आला आहे. औषधोपचारासाठी या योजनेतून १७९१ लोकांना सेवा देण्यात आली आहे. यातील सर्व सेवेसाठी १० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. राज्य शासनाने ही महत्वाकांक्षी योजना राबवून सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांना आरोग्य सेवा देण्यात आली आहे.
भंडारवाडी पाणी योजना तीन महिन्यांत...
लातूर शहरातील पाणीटंचाई लक्षात घेता ३० कोटी रुपयांची भंडारवाडी प्रकल्पातून पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. ही योजना पुढील तीन महिन्यांत पूर्ण होईल. तसे निर्देश मनपाला देण्यात आले आहेत. याशिवाय, मन्याड प्रकल्पातून पाणीपुरवठा तसेच लिंबोटी धरणातून पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. त्याअनुषंगाने प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. मन्याडच्या प्रस्तावासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सहमती दर्शविली असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.