३५ चौकांमध्ये बसविणार ‘सीसीटीव्ही’
By Admin | Updated: August 29, 2014 01:28 IST2014-08-29T00:18:40+5:302014-08-29T01:28:24+5:30
जालना : शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिस प्रशासन आणि नगरपालिकेच्या वतीने विविध ३५ चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा श्रीगणेशा

३५ चौकांमध्ये बसविणार ‘सीसीटीव्ही’
जालना : शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिस प्रशासन आणि नगरपालिकेच्या वतीने विविध ३५ चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा श्रीगणेशा २९ आॅगस्ट रोजी होत आहे. एकाच दिवशी हे कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सीसीटीव्ही बसविण्यासाठी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांच्या अध्यक्षतेखाली दहा जणांची समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या सूचनेनुसार कॅमेरे बसविण्यात येत आहेत. पालिकेने खर्चाचा भार उचलला असला तरी नियंत्रण पोलिसांकडेच राहणार आहे.
रेल्वेस्थानक, बस स्थानक, गांधी चमन, मोतीबाग, सिंधीबाजार, शिवाजी पुतळा, बाबुराव काळे चौक, गुरूबचन चौक, जिजामाता कमान, घनतृप हनुमान चौक, टांगा स्टॅण्ड, सराफा मार्केट, मंमादेवी चौक, शनी मंदिर जुना जालना, बडीसडक राम मंदिर, मुर्गी तलाब, दुर्गा माता/झाशी राणी पुतळा, महावीर चौक, सुभाष चौक, भोकरदन नाका, कन्हैय्यानगर, मंठा नाका, दत्त आश्रम आदी चौकांची निवड करण्यात आली आहे.
यासाठी वाय-फाय यंत्रणा असणार असल्याने कोठेही वायर दिसणार नाही. चौकात बसविल्यानंतर संपूर्ण चौक संरक्षित होऊ शकेल, एवढी खांबाची उंची राहील. वॉटर प्रुफ कॅमेरे १.३ मेगा फिक्सल शक्तीचे राहतील.
तसेच आय.सी. म्हणजे इंटरॉक्ट प्रोटोकॉल स्टीमचे कॅमेरे आहेत. त्याचे नियंत्रण पोलिस अधीक्षक, सदर बाजार, कदीम जालना, नगर पालिकेचे मुख्याधिकारी आणि दहा जणांच्या समिती सदस्यांच्या मोबाईलवर इंटरनेटद्वारे जोडले जातील.
शहरात मागील काही काळात रस्त्यावर खून, प्राणघातक हल्ले, चोऱ्या, लुटमार यासारख्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्याने या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. ऐन उत्सव काळात या कॅमेऱ्यांची पोलिस प्रशासनास मोठी मदत होणार आहे. (प्रतिनिधी)
सीसीटीव्ही बसविण्यासाठी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांच्या अध्यक्षतेखाली दहा जणांची समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या सूचनेनुसार कॅमेरे बसविण्यात येत आहेत. पालिकेने खर्चाचा भार उचलला असला तरी नियंत्रण पोलिसांकडेच राहणार आहे. या निर्णयाचे जानलेकरांतून स्वागत होत आहे. कॅमेरे कायमस्वरुपी ठेवण्याची मागणी आहे.