सी.सी. टी.व्ही. कॅमेरे बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात
By Admin | Updated: December 1, 2014 00:51 IST2014-12-01T00:34:19+5:302014-12-01T00:51:23+5:30
केवल चौधरी ,जालना शहर वासीयांना दिलासा देणाऱ्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी गर्दी व महत्त्वाच्या ३५ ठिकाणी सी.सी. टी.व्ही. कॅमेरे बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आ

सी.सी. टी.व्ही. कॅमेरे बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात
केवल चौधरी ,जालना
शहर वासीयांना दिलासा देणाऱ्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी गर्दी व महत्त्वाच्या ३५ ठिकाणी सी.सी. टी.व्ही. कॅमेरे बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आठ दिवसांत ही यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून ४४ लाख रूपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी जाणीवपूर्वक दखल घेऊन हा अभिनव प्रयोग मराठवाड्यात प्रथमच राबविण्यासाठी सहकार्य केल्याचे मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांनी सांगितले. संपूर्ण शहर सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यांच्या नियंत्रणात आले आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेला मोठा आधार मिळणार आहे. हे कॅमेरे व्हाय-फाय यंत्रणेद्वारे जोडण्यात आले असून सौर ऊर्जेवर आधारित आहेत. २५ ते ३५ फूट उंचीवर कॅमेरे बसविण्यात आले आहेत. शहराचा ५० टक्के भाग नियंत्रणात येणार आहे. दीड लाख लोकांना तूर्तास या निगराणीखालून वावरावे लागेल. शिवाय शहरात साजरे होणारे विविध उत्सव व धार्मिक कार्यक्रमांमध्ये कायदा व सुव्यवस्था तसेच महिला-मुलींची छेड काढणाऱ्यांना टिपले जाणार आहे. हे काम अगदी सहज व कोणालाही अजिबात खबर न लागता होणार असल्याने रात्रीच्या अंधारातही अगदी उजळ प्रतिमा टिपली जाणार आहे. ४
सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाने ४४ लाख रूपये उपलब्ध करून दिले आहेत. ही यंत्रणा उभारणारी जालना नगर पालिका मराठवाड्यात एकमेव आहे.
४पोलिस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंह यांनी सांगितले, मुख्य बाजार पेठेत होणारे गैरप्रकार रोखण्यात मोठी मदत होणार असून रात्रीच्या गस्तीत पोलिसांच्या नजरेतून सुटणारे गैरप्रकारही कॅमेऱ्यात टिपले जाणार आहेत.
४चार ठिकाणी मॉनिटरवर हे चित्रण दिसणार आहे. यात शहरातील दोन्ही पोलिस ठाणे, पोलिस अधीक्षक कार्यालय, नगर पालिका कार्यालय दिसू शकेल. या चारही ठिकाणी चित्रण दिसणार असले तरी नियंत्रण मात्र एकाच ठिकाणी राहील.
४नगराध्यक्षा पार्वतीबाई रत्नपारखे यांनी सांगितले, शहरातील स्वच्छता पाहण्यासाठी आपल्याला मोठा लाभ होणार आहे. आपल्या कार्यकाळात हे काम आहे, याचे समाधान आहे.