गौताळ्यात १४ मे रोजी प्राणीगणना
By Admin | Updated: May 8, 2014 00:25 IST2014-05-08T00:25:34+5:302014-05-08T00:25:57+5:30
कन्नड : गौताळा अभयारण्यातील प्राण्यांची गणना दि. १४ मे रोजी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी करण्यात येणार असून, वन्यजीव विभागाच्या वतीने त्या दृष्टीने तयारी करण्यात येत आहे.

गौताळ्यात १४ मे रोजी प्राणीगणना
कन्नड : गौताळा अभयारण्यातील प्राण्यांची गणना दि. १४ मे रोजी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी करण्यात येणार असून, वन्यजीव विभागाच्या वतीने त्या दृष्टीने तयारी करण्यात येत आहे. गौताळा अभयारण्य हे जळगाव व औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेंवर २६० चौ.कि.मी. क्षेत्रफळावर नैसर्गिक वनराईने नटलेले आहे. अभयारण्याचा भाग डोंगराळ आहे. या नैसर्गिक अभयारण्यात बिबटे, अस्वल, कोल्हा, लांडगा, नीलगाय, सायाळ, हरीण, ससा, माकड आदी प्राणी आहेत. या प्राण्यांची मोजदाद बुद्ध पौर्णिमेच्या रात्री करण्यात येते. बुद्ध पौर्णिमा ही मे महिन्यात येते. या रात्री स्वच्छ चंद्रप्रकाश असतो. उन्हाळ्याचे दिवस असल्याने प्राणी २४ तासांतून किमान एक ते दोन वेळा पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी येतात. त्यामुळे निरीक्षण मनोरे अथवा मचाणावर बसून प्राण्यांची मोजदाद करता येते. गौताळा औट्रम घाट परिक्षेत्रात ३२ नैसर्गिक, तर ३० कृत्रिम पाणवठे आहेत. बहुतांशी पाणवठ्याजवळ निरीक्षण मनोरे बांधण्यात आलेले आहेत, तर काही पाणवठ्यांजवळ झाडांवर मचाण बांधण्याचे काम सुरू आहे. कन्नड, नागद व चाळीसगाव वन परिक्षेत्रातील वनपाल, वनरक्षक व वनमजूर मिळून १०० कर्मचारी प्राणी गणनेत सहभागी होणार आहेत. या कर्मचार्यांचे प्रशिक्षण मंगळवारी चाळीसगाव वन परिक्षेत्रात संपन्न झाले. वन्यजीव विभागाच्या कर्मचार्यांव्यतिरिक्त निसर्गप्रेमीही प्राणी गणनेत सहभाग घेऊ शकणार आहेत; मात्र त्यासाठी दि. १३ मेपूर्वी वन्यजीव विभागाकडे नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. नाव नोंदणी करणार्या निसर्गप्रेमीने पासपोर्ट साईजचे दोन फोटो देणे आवश्यक आहे. प्राणीगणनेसाठी येणार्या निसर्गप्रेमीस ओळखपत्र देण्यात येणार असून, ओळखपत्राव्यतिरिक्त बुद्ध पौर्णिमेच्या रात्री कुणासही अभयारण्यात प्रवेश दिला जाणार नाही, असे वन्यजीव विभागाच्या सूत्रांनी सांगितले. यावर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे अभयारण्यात पाणवठ्यांव्यतिरिक्त इतर ठिकाणीही पाण्याची उपलब्धता असल्याने प्राणीगणनेत तफावत निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असले तरीही प्राणीगणनेच्या तयारीसाठी वन्यजीव विभागाकडून सर्व दक्षता घेण्यात येत आहे. (वार्ताहर)