फटाका बाजारात खबरदारी

By Admin | Updated: October 31, 2016 00:54 IST2016-10-31T00:52:08+5:302016-10-31T00:54:35+5:30

नांदेड :शहरात गुरूद्वारा मैदानावर सुरू असलेल्या फटाका बाजारात नियमांचे सर्रास उल्लंघन सुरू असून औरंगाबादमध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर नांदेड महापालिकेने सलग दुसऱ्या दिवशी फटाका बाजारात तपासणी केली़

Caution in the cracker market | फटाका बाजारात खबरदारी

फटाका बाजारात खबरदारी

नांदेड :शहरात गुरूद्वारा मैदानावर सुरू असलेल्या फटाका बाजारात नियमांचे सर्रास उल्लंघन सुरू असून औरंगाबादमध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर नांदेड महापालिकेने सलग दुसऱ्या दिवशी फटाका बाजारात तपासणी केली़ या तपासणीत अग्निशमन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकांनाना सीलही ठोकण्यात आल्याची माहिती उपायुक्त संतोष कंदेवार यांनी दिली़
शहरातील हिंगोली गेट भागातील गुरूद्वारा मैदानावर यंदा पहिल्यांदाच फटाका बाजार भरवण्यात आला आहे़ २५ आॅक्टोबर ते १ नोव्हेंबरपर्यंत या बाजारास परवानगी दिली आहे़ ही परवानगी देताना जिल्हा प्रशासनाने महापालिका अग्निशमन विभाग, पोलिस दल, महावितरण यांचेही नाहरकत प्रमाणपत्र घेतले आहे़महत्वाचे म्हणजे अग्निशमन विभागाकडून नाहरकत प्रमाणपत्र देताना आवश्यक ते नियम व अटी फटाके व्यापाऱ्यांपुढे ठेवण्यात येतात, या अटी व नियमांना व्यापाऱ्यांकडून होकारही दिला जातो़
मात्र प्रत्यक्षात किती नियमांचे पालन केले जाते हे प्रत्यक्ष फटाका बाजारात महापालिकेने दोन दिवस केलेल्या पाहणीत स्पष्ट झाले आहे़ अनेक व्यापाऱ्यांनी कागदावरच नियम व अटी ठेवल्या असून धोकादायकरित्या विक्री सुरू ठेवली़
औरंगाबादमध्ये २९ आॅक्टोबर रोजी घडलेल्या दुर्घटनेनंतर महापालिकेचे उपायुक्त संतोष कंदेवार, अग्निशमन अधिकारी रईस पाशा हे मनपा पोलिस पथकासह फटाका बाजारात पोहोचले़ त्यावेळी अनेक दुकानांमध्ये आग प्रतिबंधात्मक उपकरणे नसल्याची बाब पुढे आली़ तसेच अनेक ठिकाणी आग विझविण्यासाठी आवश्यक असलेल्या पाण्याची उपलब्धताही नव्हती़ फटाका बाजारातील धोकादायक परिस्थिती लक्षात घेता उपायुक्त कंदेवार यांनी शनिवारी २१ फटाका दुकाने तात्पुरत्या कालावधीसाठी सील केली़ रविवारीही सकाळीच फटाका बाजारात पाहणी करून काही दुकाने सील केली़ मनपा पथकाने दुकानासमोर मोठ्या प्रमाणात ठेवलेला फटाक्यांचा साठा सुरक्षीत स्थळी ठेवण्याचे आदेश दिले़ या सूचनेकडे दुर्लक्ष करणाऱ्या काही फटाका विक्रेत्यांचा मालही महापालिकेने जप्त केला़ मनपाने एक अग्निशमन बंब दुकाने लावल्यापासूनच फटाके बाजारात ठेवण्यात आला आहे़ फटाका बाजारात पाण्याचे दोन टँकरही ठेवण्यात आले आहेत़ अग्निशमन अधिकारी रईस पाशा हे आपल्या कर्मचाऱ्यांसह फटाका बाजारमध्ये तळ ठोकून आहेत़
महापालिकेकडून फटाका बाजारसाठी दिलेली परवानगी ही फटाका असोसिएशनच्या नावाने देण्यात आली आहे़ रविवारी उपायुक्त कंदेवार यांनी केलेल्या पाहणीत फटाका असोसिएशनच्या उपाध्यक्षांच्या दुकानातच अग्निशमन उपकरण उपलब्ध नसल्याची बाब पुढे आली़ त्यामुळे ते दुकानही सील करण्यात आले़ (प्रतिनिधी)

Web Title: Caution in the cracker market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.