रेल्वे आगीचे कारण गुलदस्त्यात
By Admin | Updated: October 27, 2014 00:13 IST2014-10-26T23:56:53+5:302014-10-27T00:13:33+5:30
औरंगाबाद : नांदेड- मनमाड पॅसेंजरला औरंगाबाद- दौलताबाद रेल्वेस्थानकादरम्यान आग लागल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

रेल्वे आगीचे कारण गुलदस्त्यात
औरंगाबाद : नांदेड- मनमाड पॅसेंजरला औरंगाबाद- दौलताबाद रेल्वेस्थानकादरम्यान आग लागल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. जळालेल्या बोगीत एक स्टोव्ह आढळून आला, या स्टोव्हमुळे आग लागली असावी, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याचबरोबर शॉर्टसर्किट, ब्रेक लायनरमधील तांत्रिक दोष, एखाद्या प्रवाशाने बिडी- सिगारेट पेटविण्याचा प्रयत्न केल्यानंतर ही आग लागली का, या सर्व दिशांनी तपास करण्यात येत आहे. या तपासासाठी रेल्वेच्या चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक समिती गठीत करण्यात आल्याचे विभागीय व्यवस्थापक पी.सी. शर्मा यांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच दक्षिण मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक (डीआरएम) पी.सी. शर्मा यांच्यासह नांदेड, औरंगाबाद येथील अधिकाऱ्यांनी जळालेल्या बोगीची पाहणी केली.
दुर्घटनाग्रस्त बोगीला घटनास्थळी सोडून नांदेड- मनमाड पॅसेंजर सात बोगींसह पहाटे ३.३५ वाजता दौलताबाद स्थानकाकडे रवाना झाली, तर दुर्घटनाग्रस्त बोगीचा मागील भाग ४ वाजता औरंगाबाद स्थानकावर रवाना झाला. या रेल्वेगाडीतील प्रवाशांना रेल्वे प्रशासनातर्फे दौलताबाद स्थानकावर पाणी आणि खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले. घटनेनंतर या रेल्वेने मनमाडकडे जाण्याचे प्रवाशांनी टाळले. यावेळी त्यांनी अन्य रेल्वेने पुढे जाण्यास प्राधान्य दिले. या दुर्घटनेनंतर अंधार आणि रेल्वे रुळाच्या बाजंूच्या झाडांमुळे प्रवाशांची धावपळ उडाली होती.
रेल्वेगाड्यांची देखभाल अन दुरुस्तीकडे दुर्लक्ष
नांदेड-मनमाड पॅसेंजरच्या बोगीला आग लागलेल्या घटनेमागे शार्टसर्किट, ब्रेक लायनरमधील तांत्रिक दोष आदी कारणांची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशा स्थितीमुळे रेल्वेगाड्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीकडे दक्षिण मध्य रेल्वेचे दुर्लक्ष होत आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पूर्णा येथे रेल्वेचे मेन्टेनन्स केले होते. ते पूर्वीप्रमाणे सुरूकरावे, अशी मागणी या घटनेनंतर जोर धरत आहे.
गेल्या काही वर्षांत देशभरात रेल्वेगाड्यांच्या बोगींना आग लागल्याच्या घटना वेळोवेळी उघडकीस आल्या; परंतु त्यांची पुनरावृत्ती टाळण्यात रेल्वे प्रशासनाला अपयश येत असल्याचे रविवारी पहाटे झालेल्या घटनेनंतर दिसून येत आहे. अशा घटनेमागे शार्टसर्किट, रेल्वेगाडीच्या ब्रेकच्या घर्षणाची शक्यता वर्तविण्यात आली. त्यामुळे जीवित हानी टाळण्यासाठी या बाबींकडे रेल्वे प्रशासनाने अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे; परंतु त्याकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या गाड्यांच्या बोगी आणि इंजिन यांची पुणे, कल्याण आदी ठिकाणी देखभाल दुरुस्ती केली जाते.
काही वर्षांपूर्वी रेल्वे प्रशासनाने पूर्णा येथील लोको शेड हलविला. अन्य ठिकाणी रेल्वे बोगी, इंजिन, ब्रेक यांची तपासणी केली जात आहे; परंतु देखभाल आणि दुरुस्तीसाठी डिझेल लोको शेड पूर्णा येथेच कायम ठेवण्याची मागणी केली जात आहे. त्याकडे रेल्वे प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करीत आहे.
दुरुस्तीकडे दुर्लक्ष
रविवारी पहाटे घडलेल्या घटनेनंतर रेल्वेगाड्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीकडे होत असलेल्या दुर्लक्षाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. येथे जवळपास कोठेच रेल्वेच्या देखभाल दुरुस्तीची व्यवस्था नसल्याने बोगींमधील वायरिंग, ब्रेक तपासणी योग्य पद्धतीने नाही.
रेल्वे प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळेच अशा दुर्घटना घडत आहेत. अशा दुर्घटना टाळण्यासाठी पूर्णा येथेच डिझेल लोको शेड सुरूकरण्याची आवश्यकता असल्याचे रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांनी म्हटले.
फॉरेन्सिककडूनही तपासणी
घटनेमागे घातपाताचीही शक्यता नाकारता येत नसल्याने रेल्वे अधिकाऱ्यांनी जळालेल्या रेल्वे बोगीची फॉरेन्सिकच्या पथकाकडून तपासणी करण्याची मागणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांनीही फॉरेन्सिक तपासणी करण्याची सूचना केली.
यानंतर रविवारी दुपारी न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेचे सहायक संचालक ए.बी. भंगाळे व त्यांच्या टीमने घटनास्थळी जाऊन त्या बोगीची तपासणी केली, तसेच तेथून काही नमुने गोळा करून ते प्रयोगशाळेत नेले. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर आगीचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
रेल्वेसेवेवर परिणाम
घटनेमुळे मनमाड- काचीगुडा पॅसेंजर ही २६ आॅक्टोबरला दौलताबाद- मनमाड आणि मनमाड- दौलताबाद स्थानकादरम्यान अंशत: रद्द करण्यात आली, तर रात्री १.२२ वाजता रवाना होणारी हैदराबाद- अजमेर एक्स्प्रेस गाडी सकाळी ६ वाजेच्या सुमारास औरंगाबाद स्थानकाहून रवाना झाली. काकीनाडा- नगरसोल ही गाडी उशिरा धावली.
...तर मोठी दुर्घटना
दुर्घटनेनंतर रेल्वे मिटमिट्याजवळ रेल्वे रुळावर थांबली होती. याचवेळी मनमाडमार्गे जाणारी हैदराबाद- अजमेर एक्स्प्रेस रात्री दीड वाजेच्या सुमारास औरंगाबाद स्थानकावर आली. घटनेची माहिती मिळाल्याने ही गाडी स्थानकावरच थांबविण्यात आली. माहिती मिळण्यास थोडाही उशीर झाला असता, तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.न्
ोमके कारण चौकशीनंतरच
आगीचे नेमके कारण सांगता येणार नाही. विविध शक्यतांची पडताळणी केली जाईल. घटनेच्या चौकशीसाठी चार अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली. या अपघातात कुणीही जखमी झालेले नाही, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक पी.सी. शर्मा यांनी सांगितले.
नांदेड-मनमाड पॅसेंजर रेल्वेच्या बोगीला आग लागलेल्या घटनेनंतर औरंगाबाद येथील रेल्वेच्या दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. औरंगाबाद स्थानकावर ही गाडी आल्यानंतर गाडीची तपासणी करण्याकडे दुर्लक्ष आणि हलगर्जीपणा केल्याबद्दल त्यांना निलंबित केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.