महासंकल्प... मांजरा नदीच्या खोलीकरणाचा !
By Admin | Updated: April 7, 2016 00:29 IST2016-04-07T00:10:15+5:302016-04-07T00:29:15+5:30
लातूर : लातूर शहराच्या पाणीटंचाईवर उत्तर शोधण्यासाठी आता लातूरकरच पुढे सरसावले आहेत. आपली नावे, आपल्या संस्था, आपले पक्ष आणि आपले विचार बाजूला ठेवून

महासंकल्प... मांजरा नदीच्या खोलीकरणाचा !
लातूर : लातूर शहराच्या पाणीटंचाईवर उत्तर शोधण्यासाठी आता लातूरकरच पुढे सरसावले आहेत. आपली नावे, आपल्या संस्था, आपले पक्ष आणि आपले विचार बाजूला ठेवून समस्त लातूरकरांना हाक देण्यात आली आहे. डॉ. अशोक कुकडे, अॅड. त्र्यंबकदास झंवर, अॅड. मनोहरराव गोमारे आणि बी. बी. ठोंबरे या चौघांचे मागदर्शक पॅनल बनविण्यात आले असल्याची माहिती मकरंद जाधव यांनी महाराष्ट्र बायोफर्टिलायझरच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. फक्त ‘पाणी’ या एकाच विषयासाठी तहानलेल्या लातुरातील नानाविध संघटनांचे प्रतिनिधी एक झाले असून, बुधवारी सायंकाळी भालचंद्र ब्लड बँकेत झालेल्या व्यापाऱ्यांच्या सभेत ४ लाख ५१ हजार रुपयांचा निधी गोळा झाला. यामुळे आता ही चळवळ अधिक गतिमान होणार असल्याचेही जाधव म्हणाले.
फक्त लातुरातीलच नव्हे तर परदेशात विसावलेल्या अस्सल लातूरकरांनी ‘एनआरआय लातूर’ असा व्हाटस् अॅप ग्रुप’ बनविला आहे. लातूर माहेर असलेल्या लेकीबाळींना ‘माझ्या माहेरा’साठी म्हणून जमेल तेवढ्या मदतीची हाक दिली आहे. तीन बँकांत खाते उघडण्यात येणार आहे. ‘आपले पाणी आपणच साठवूया’ हा मूलमंत्र घेऊन येत्या ८ मार्चला मांजरा नदीच्या पात्रात १० पोकलेनच्या मदतीने गाळ उपशाच्या महासंकल्पाला सुरुवात होत आहे. अखंड दोन महिने ‘मांजरा’च्या पात्रात चालणाऱ्या या महाअभियानाच्या कृती, निधी आणि वेळ या तिन्ही गोष्टीसाठी लातूरकरांनी मदत करावी, अशी अपेक्षा कुकडे, गोमारे, झंवर आणि ठोंबरे यांनी केली आहे. या महत्त्वकांक्षी लोकचळवळीचा ‘लोकमत’ने घेतलेला हा आढावा.
सरकारी यंत्रणा काहीतरी करेल यापेक्षा लातूरकरांनीच लातूरकरांच्या पाण्यासाठी प्रयत्न केले तर ? या विचाराने शहरातील काही मंडळी एकत्र आली. तीन मार्च रोजी पहिली बैठक झाली. ज्यात शहरातील साठ लोक उपस्थित होते. दि. पाच एप्रिल रोजी दुसरी बैठक व्यापारी मंडळाची झाली. आणि आता तिसरी बैठक शहरातील ६५ व्यापारी संघटनांची दि. ६ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता भालचंद्र ब्लड बँकेच्या सभागृहात तिसरी बैठक घेऊन एक कृती आराखडा ठरला. एकविचाराचा आणि कामाचाही. डॉ. अशोक कुकडे, अॅड. मनोहरराव गोमारे, अॅड. त्र्यंबकदास झंवर आणि बी. बी. ठोंबरे या वेगवेगळ्या विचारधारा आणि उद्योगातील श्रेष्ठींनी पुढाकार घेऊन याचे नेतृत्व स्विकारीत मार्गदर्शक पॅनलमध्ये बसण्याला मान्यता दिली. आता खाली कामगारांची यादी असंख्य लोकांची. यातला कुणी उद्योजक, कुणी श्री. श्री. परिवाराचा साधक, कुणी शिक्षक, कुणी प्राध्यापक, कुणी ट्रॅव्हल्सवाला, कुणी कँटीनवाला, कुणी व्यापारी, कुणी कारखानदार, कुणी दुकानदार, कुणी पत्रकार, कुणी राजकारणात छोट्या-मोठ्या पदावर तर कुणी संघटनेचा पदाधिकारी. या साऱ्या शे दीडशे लोकांनी एकत्र येऊन लोकचळवळ उभी केली. ‘मांजरा’ खोलीकरण आणि रुंदीकरणासाठी सुरु झालेल्या या चळवळीने ‘जलयुक्त लातूर’ हा एक फलक आपल्या हातात पकडला आहे. (प्रतिनिधी)
मांजरा नदीतील गाळ काढण्यासाठी बुधवारी सायंकाळी भालचंद्र ब्लड बँकेच्या सभागृहात व्यापारी महासंघाच्या विविध असोसिएट्स संघटनांची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत ४ लाख २३ हजार रुपयांचा निधी संकलित झाला. राज मोटर्सचे अनिल शिंदे यांनी १ लाख ५१ हजार रुपये, बी.बी. ठोंबरे यांनी नॅचरल शुगर्स रांजणीच्या वतीने १ लाख ५१ हजार रुपये, राजस्थान विद्यालयाच्या १९७८ च्या बॅचच्या वतीने ५१ हजार रुपये, श्री नाबदे यांनी ५१ हजार रुपये, विशाल अग्रवाल यांनी ५१ हजार रुपये दिल्याची घोषणा केली. हे सगळे मिळून ४ लाख २१ हजार रुपये अवघ्या एका बैठकीत गोळा झाल्याने या चळवळीला चांगलेच बळ मिळाले आहे.
यासंबंधीची माहिती देण्यासाठी उद्योग भवनातील ‘एमबीएफ’च्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत २१ हजारांचा निधी संकलित झाला. पत्रकार रामेश्वर बद्दर यांनी ११ हजार रुपये तर जयप्रकाश दगडे आणि प्रदीप नणंदकर या दोघांनी प्रत्येकी पाच हजाराचा निधी सुपूर्द केला.