जातीचे ना धर्माचे... महापुरूष सर्वांचे
By Admin | Updated: May 22, 2017 23:39 IST2017-05-22T23:35:07+5:302017-05-22T23:39:24+5:30
उस्मानाबाद :महापुरूष कोण्या एका विशिष्ट जाती-धर्माचे नसून ते सर्व सामाजाचे प्रेरणास्थान आहेत. मात्र, काही विघातक प्रवृत्ती महापुरूषांची बदनामी करीत जाती-जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात

जातीचे ना धर्माचे... महापुरूष सर्वांचे
लोकमत न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : सर्वच महापुरुषांनी या देशाच्या विकासासाठी, उन्नतीसाठी योगदान दिलेले आहे. त्यामुळे महापुरूष कोण्या एका विशिष्ट जाती-धर्माचे नसून ते सर्व सामाजाचे प्रेरणास्थान आहेत. मात्र, काही विघातक प्रवृत्ती महापुरूषांची बदनामी करीत जाती-जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. लातूर जिल्ह्यातील एका विक्षिप्त व्यक्तीने अशाच प्रकारे महापुरूषाविषयी अपमानजनक उल्लेख करून सर्व भारतीयांची मने दुखावली आहेत. या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मंगळवारी सायंकाळी सहा वाजता नगर परिषदेजवळील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात एकत्रित येण्याचे आवाहन शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
सदर व्यक्तीने महापुरूषाचा अपमानजक उल्लेख सोशल मिडियावर केला आहे. अशा प्रवृत्तीचा कायमचा बंदोबस्त व्हावा, या उद्देशाने समाजातील सर्व जाती, धर्म, पंथ, राजकीय पक्षाच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येवून
निषेध करावा आणि विघातक प्रवृत्तींचा डाव हाणून पाडावा, यासाठीच या निषेध बैठकीचे आयोजन केल्याचे शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे अध्यक्ष ओंकार नायगावकर यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.