युवकांच्या टीमद्वारे ‘कॅशलेस’ची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2017 23:11 IST2017-02-06T23:07:02+5:302017-02-06T23:11:40+5:30
उस्मानाबाद : जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण भागातील अधिकाधिक नागरिकांनी कॅशलेस व्यवहारावर भर द्यावा, यासाठी एनएसएसच्या युवकांच्या २४ संस्थांच्या प्रत्येकी दोन टीम तयार करण्यात येणार आहेत़

युवकांच्या टीमद्वारे ‘कॅशलेस’ची माहिती
उस्मानाबाद : जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण भागातील अधिकाधिक नागरिकांनी कॅशलेस व्यवहारावर भर द्यावा, यासाठी जिल्ह्यातील एनएसएसच्या युवकांच्या २४ संस्थांच्या प्रत्येकी दोन टीम तयार करण्यात येणार असून, यातील युवकांच्या माध्यमातून कॅशलेस व्यवहाराची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविली जाणार आहे़ जी टीम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल त्यांना जिल्हाधिकाऱ्यांकडून सुवर्णपदक व राज्य शासनाचे प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली़
उस्मानाबाद शहरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील सभागृहात सोमवारी सकाळी ‘डिजिटल कॅश अवरनेस प्रोग्राम’ या विषयावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते़ आयुष प्रसाद म्हणाले, राज्य शासनाने राज्यातील यवतमाळ व उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांची ‘डिजिटल कॅश अवरनेस प्रोग्राम’साठी निवड केली आहे़ यवतमाळ येथील कामकाज सुरू झाले असून, उस्मानाबादेतही दोन आठवड्यांचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे़ नोटाबंदीनंतर मोठ्या शहरांमधील नागरिकांनी आता कॅशलेस व्यवहारांवर मोठा भर दिला आहे़ या व्यवहारांमध्ये ग्रामीण भागातील नागरिक मागे राहू नयेत, यासाठी ‘डिजिटल कॅश अवरनेस प्रोग्राम’ हाती घेण्यात आला आहे़ सर्वसामान्यांमध्ये कॅशलेस व्यवहारांबाबत असलेले गैरसमज दूर करून त्यांच्यामध्ये जनजागृती केली जाणार आहे़ यासाठी जिल्ह्यातील २४ संस्थांमधील एनएसएसच्या युवकांची मदत घेण्यात येणार आहे़ प्रत्येक संस्थेला १५ ते २० युवकांची एक या प्रमाणे दोन टीम तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़
तयार होणाऱ्या टीमला मंत्रालयातील तीन मुख्य ट्रेनर प्रशिक्षण देणार आहेत़ यात विविध बँकांची आॅनलाईन व्यवहार, शासनाचे भिम अॅप व इतर कॅशलेस व्यवहारांबाबत माहिती देण्यात येणार आहे़ विशेष म्हणजे तयार होणाऱ्या टीमपैकी जी टीम सर्वाधिक लोकांपर्यंत पोहोचेल त्या टीमला जिल्हाधिकारी यांचे सुवर्णपदक मिळणार आहे़ तर राज्य शासनाकडून प्रमाणपत्रही मिळणार असल्याचे प्रसाद यावेळी म्हणाले़ (प्रतिनिधी)