छत्रपती संभाजीनगर : शहरातील दिल्ली गेट ते हर्सूल टी पॉइंटदरम्यान महापालिकेच्या पथकाने सोमवारी (दि. ७) अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. दिल्ली गेट परिसरात पथक अतिक्रमण काढत असताना, काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यात अडथळा निर्माण करणाऱ्यांची ओळख पटवून गुन्हे नोंदविण्याचे आदेश पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. दरम्यान, रस्ता रुंदीकरणाच्या वेळी दिल्ली गेट येथे तणाव निर्माण करणाऱ्यांवर रात्री उशिरा कारवाई करण्यात आली.
पोलिस बंदोबस्तात महापालिकेच्या पथकाने शहराच्या चारही बाजूच्या मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. जालना रोड, पैठण, पडेगाव रस्त्यावरील अतिक्रमणावर बुलडोझर चालवल्यानंतर सोमवारी दिल्ली गेट ते हर्सूल टी पॉइंट रस्त्याकडे मोर्चा वळवला. सकाळी दिल्ली गेटच्या बाजूलाच एका ज्यूसच्या दुकानावर कारवाई सुरू असतानाच काही नागरिकांनी विरोध केला, तेव्हा पोलिसांची अधिकची कुमकही मागविण्यात आली. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. विरोध करणाऱ्यांना बाजूला करीत पुन्हा मोहीम सुरू केली.
पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी घटनास्थळावरील पोलिस अधिकाऱ्यांकडून वस्तुस्थितीची माहिती घेतल्यानंतर संबंधितांवर गुन्हे नोंदविण्यात आदेश दिले आहेत, तसेच यापुढे कुणीही अतिक्रमण हटाव मोहिमेत अडथळा निर्माण केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यासाठी पोलिस प्रशासन पुढाकार घेणार असल्याचेही पोलिस आयुक्त पवार यांनी सांगितले.
सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलपोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार १८ ते १९ जणांविरुद्ध सिटी चौक ठाण्यात सोमवारी (दि.७) रात्री गुन्हा नोंदविण्यात आला. डी लाईट ज्यूस सेंटरचे मालक, रियाज, जुबेर झहीर बागवान, रफिक यांचा मुलगा तसेच १२ ते १५ अनोळखी व्यक्ती अशी आरोपींची नावे आहेत.दिल्ली गेट येथे सोमवारी (दि.७) सकाळी पोलिस, मनपा पथकावर टोळके धावून गेले. शिवीगाळ, दगडफेक करून धक्काबुक्की केली होती नागरी मित्र पथकातील कर्मचाऱ्यांवर रियाज हा दगड घेऊन धावून गेला. त्यावरून मनपाचे प्रभारी बहायक आयुक्त संजय कर यांच्या तक्रारीवरून सिटी चौक ठाण्यात गुन्हा नोंदविला.
विरोध करण्याचा ट्रेंड निर्माण होऊ नयेअतिक्रमण हटाविण्याचा निर्णय महापालिका घेते. कारवाईस कोणत्याही प्रकारे नियमबाह्यपणे विरोध करून मोहिमेत अडथळा निर्माण होऊ नये, याची दक्षता पोलिस घेत आहेत. एखाद्या ठिकाणी विरोध केल्यानंतर संबंधितांवर नियमांनुसार कारवाई न केल्यास विरोध करण्याचा ट्रेंड निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पोलिस प्रशासन स्वत:हून पुढाकार घेत विरोध करणाऱ्यांवर गुन्हे नोंदवणार असल्याचे पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.