एससी, एसटी प्रवर्गातील महिला सदस्य निवडून न आलेल्या ठिकाणी पुरुषाला होता येणार सरपंच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:05 IST2021-02-12T04:05:37+5:302021-02-12T04:05:37+5:30
पैठण : सरपंचपदासाठी आरक्षण निघालेल्या अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील महिला सदस्य निवडून न आलेल्या ग्रामपंचायतीमध्ये त्या प्रवर्गातील पुरुष ...

एससी, एसटी प्रवर्गातील महिला सदस्य निवडून न आलेल्या ठिकाणी पुरुषाला होता येणार सरपंच
पैठण : सरपंचपदासाठी आरक्षण निघालेल्या अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील महिला सदस्य निवडून न आलेल्या ग्रामपंचायतीमध्ये त्या प्रवर्गातील पुरुष सदस्यास आता सरपंच होता येणार आहे. याबाबत तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी गुरुवारी परिपत्रक काढून घोषणा केली. तालुक्यातील चार ग्रामपंचायतींमध्ये या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण निघूनही तेथे महिला सदस्य निवडून न आल्याने ते पद रिक्त राहणार होते व तेथील कारभार उपसरपंच पाहतील असे प्रशासनाने घोषित केल्यानंतर ‘लोकमत’ने याबाबत ७ फेब्रुवारी रोजी वृत्त प्रकाशित करून यावर वाचा फोडली होती. या वृत्ताचा आधार घेत काही सदस्यांनी न्यायालयात धाव घेतली होती.
६ फेब्रुवारी रोजी काढण्यात आलेल्या आरक्षणात ढाकेफळ ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलेसाठी निघाले, तर एकतुनी, आडूळ खुर्द व रांजणगाव दांडगा येथील सरपंचपद अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव झाले. वास्तविक या ग्रामपंचायतींत सरपंचपदासाठी निघालेल्या प्रवर्गातील सदस्यच निवडून आलेला नसल्यामुळे या ग्रामपंचायतीचे सरपंचपद रिक्त राहणार होते. यावर ‘लोकमत’ने वाचा फोडल्यानंतर काही सदस्यांनी न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने याबाबत जिल्हा प्रशासनास दिलेल्या निर्देशानुसार या ग्रामपंचायतीचे आरक्षण त्या प्रवर्गातील पुरुषासाठी रूपांतरित करण्यात आले आहे. याबाबत तसे आदेश तहसीलदारांनी काढले आहे.
कोट
आडूळ, ढाकेफळ, रांजणगाव दांडगा व एकतुनी ग्रामपंचायतीमध्ये ६ फेब्रुवारी काढण्यात आलेल्या आरक्षणात अनु.जाती महिला/ अनु. जमाती महिला उमेदवार उपलब्ध नसल्यामुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९६४चे नियम ४ अन्वये सदरील आरक्षण उपलब्ध असलेल्या त्याच संवर्गातील निवडून आलेल्या पुरुषाच्या जागेसाठी निश्चित केले आहे. सदरील उमेदवाराचे नामनिर्देशन पत्र सरपंच निवडणुकीसाठी ग्राह्य धरण्यात येईल.
-चंद्रकांत शेळके,
तहसीलदार, पैठण
चौकट
आज होणार सरपंचपदाची निवड
पैठण तालुक्यातील ८० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची शुक्रवारी १२ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. तालुक्यात यासाठी ८६ अध्यासी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.