खून प्रकरणी एकास जन्मठेप
By Admin | Updated: December 12, 2014 00:52 IST2014-12-12T00:50:00+5:302014-12-12T00:52:54+5:30
उमरगा : किरकोळ कारणावरून एका महिलेच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देत तिचा खून करणाऱ्यास उमरगा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम़एस़मुंगले यांनी जन्मठेप

खून प्रकरणी एकास जन्मठेप
उमरगा : किरकोळ कारणावरून एका महिलेच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देत तिचा खून करणाऱ्यास उमरगा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम़एस़मुंगले यांनी जन्मठेप व २५ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली़ ही घटना ४ एप्रिल २०१३ रोजी आलूर (ता़उमरगा) येथे घडली होती़
सहाय्यक सरकारी वकिल व्ही़एस़आळंगे यांनी दिलेली माहिती अशी की, आलूर येथील शाम अंबाजी जाधव यांची मुलगी सुवर्णा ही पती संभाळत नसल्याने मुलगा शिवराज याच्यासोबत माहेरी खोली करून राहत होती़ मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या सुवर्णा ही सुनिल गणपती ज्योती यांच्या यांच्या शेतात मजुरीने कामास जावू लागल्या़ त्यातच त्यांचे प्रेमसंबंध जुळले होते़ सुनिल ज्योती हा तिच्या खोलीवर राहून तिस उपजिविकेचे साधन पुरवित होता़ त्यांच्यात किरकोळ कारणावरून वादही होत होते़ सुनिल ज्योती हा सतत सुवर्णा हिस ‘तुझ्या आई-वडिलास, भावास बोलायचे नाही, त्यांच्या कार्यक्रमास जायचे नाही’ असे म्हणून त्रास देत होता़ ४ एप्रिल २०१३ रोजी सुवर्णाचे चुलते राम अंबाजी जाधव यांच्या घरी कंदुरीचा कार्यक्रम असल्याने सुवर्णा व तिच्या मुलास बोलाविण्यात आले होते़ ती घरी आल्यानंतर वडिलांनी विचारणा केली असता सुनिल याने ‘कार्यक्रमास जावू नको, कार्यक्रमास गेलीस तर तिला जिवंत ठेवणार नाही’ अशी धमकी दिल्याचे सांगितले़ आळंद येथील कार्यक्रम झाल्यानंतर ती घरी आली होती़ त्यावेळी सुनिल याचा फोन आल्याने ती रागाने मुलगा शिवराज याला घेवून घरी गेली़ त्याचवेळी तिच्या घराजवळून ओरडण्याचा व आगीचा उजेड आल्याने परिसरातील लोक तेथे गेले़ शाम जाधव व राम जाधव यांनी जावून पाहिले असता सुवर्णा ही पत्र्याच्या शेडला चिटकून मयत झाल्याचे दिसून आले़ तर शिवराज हा तिथे रडत बसला होता़ शिवराजकडे विचारणा केली असता त्याने सुनिल गणपती ज्योती याने सुवर्णा यांच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिल्याचे सांगितले़ या प्रकरणी शाम जाधव यांच्या फिर्यादीवरून उमरगा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ तत्कालीन अतिरिक्त पोलीस अधीक्षक एम़राजकुमार यांनी तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते़ या प्रकरणात तपासण्यात आलेले साक्षीदारांची साक्ष व सहाय्यक सरकारी वकिल व्ही़एस़आळंगे यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम़एस़मुंगले यांनी सुनिल ज्योती यास जन्मठेप व २५ हजार रूपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली़ तसेच दंडाची रक्कम नुकसानभरपाई म्हणून मयताचा मुलगा शिवराज राजू माने यास देण्याचे आदेश दिले़ दंड न दिल्यास दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षाही यावेळी सुनावण्यात आल्याचे अॅड़ आळंगे यांनी सांगितले़ (वार्ताहर)