‘त्या’ प्रकरणाची आज चौकशी होणार
By Admin | Updated: January 3, 2015 00:11 IST2015-01-03T00:07:00+5:302015-01-03T00:11:35+5:30
औरंगाबाद : ‘थर्टीफर्स्ट’च्या पार्श्वभूमीवर वसतिगृहातील विद्यार्थिनी व एका प्राध्यापकाने घातलेल्या गोंधळाची चौकशी शनिवारी विद्यापीठातील महिला तक्रार निवारण समितीसमोर होईल.

‘त्या’ प्रकरणाची आज चौकशी होणार
औरंगाबाद : ‘थर्टीफर्स्ट’च्या पार्श्वभूमीवर वसतिगृहातील विद्यार्थिनी व एका प्राध्यापकाने घातलेल्या गोंधळाची चौकशी शनिवारी विद्यापीठातील महिला तक्रार निवारण समितीसमोर होईल.
‘त्या’ प्राध्यापकाने दिलेली धमकी व मुलींच्या वसतिगृहासमोर ३१ डिसेंबर रोजी रात्री १० ते १०.३० वाजेदरम्यान घातलेल्या गोंधळाची तक्रार विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. चेतना सोनकांबळे यांनी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, कुलसचिव डॉ. धनराज माने, विद्यापीठ प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड व विद्यापीठातील महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा डॉ. मेबल फर्नांडिस यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे. त्यानुसार महिला तक्रार निवारण समितीने शनिवारी या प्रकरणाची चौकशी ठेवली आहे. दरम्यान, कुलगुरू डॉ. चोपडे हे इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये सहभागी होण्यासाठी शुक्रवारी मुंबईला गेले. तत्पूर्वी, त्यांनी या प्रकरणाची चौकशी करून सदरील प्राध्यापकाविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
वसतिगृहात राहणाऱ्या एम.फिल.च्या विद्यार्थ्यांची दोन वर्षांची मुदत २० जानेवारी रोजी संपुष्टात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी कल्याण विभागाच्या संचालिका डॉ. चेतना सोनकांबळे यांनी चार दिवसांपूर्वीच संबंधित वसतिगृहाबाहेर विद्यार्थ्यांची यादी डकवली आहे. यादीत नाव असलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी २० जानेवारी रोजी वसतिगृह सोडण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तेव्हा ३१ डिसेंबर रोजी रात्री सदरील वसतिगृहातील विद्यार्थिनी व त्या प्राध्यापकाने २० जानेवारी रोजी वसतिगृह खाली करण्याऐवजी आताच आम्ही वसतिगृह सोडतो, असा हट्ट धरला होता. रात्री वसतिगृहाबाहेर जाता येणार नाही, अशी भूमिका डॉ. सोनकांबळे यांनी घेतली होती.