तिजोरी भरण्यात ‘सीए’ चा हातभार
By Admin | Updated: June 18, 2016 01:01 IST2016-06-17T23:56:44+5:302016-06-18T01:01:51+5:30
औरंगाबाद : सर्व व्यावसायिकांचा चार्टर्ड अकाऊंटंटस्वर (सीए) मोठा विश्वास असतो. ‘सीए’च्या सल्ल्यांमुळेच राज्य सरकारची तिजोरी भरण्यास मोठी मदत होते,

तिजोरी भरण्यात ‘सीए’ चा हातभार
औरंगाबाद : सर्व व्यावसायिकांचा चार्टर्ड अकाऊंटंटस्वर (सीए) मोठा विश्वास असतो. ‘सीए’च्या सल्ल्यांमुळेच राज्य सरकारची तिजोरी भरण्यास मोठी मदत होते, असे प्रतिपादन राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी येथे केले. पैशांचा मोह सर्वांनाच असतो; परंतु त्यामुळे झोप खराब होणार नाही, अशी गोष्ट मात्र कदापि करू नका, असा सल्लाही त्यांनी दिला.
इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊंटंटस् आॅफ इंडियाच्या (आयसीएआय) औरंगाबाद शाखेतर्फे आयोजित ‘काँकरिंग अहेड’ या दोनदिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम, ‘आयसीएआय’चे अध्यक्ष एम. देवराजा रेड्डी, औरंगाबाद शाखेच्या अध्यक्षा रेणुका देशपांडे, विजयकुमार गुप्ता, मंगेश किनरे, प्रफुल्ल छाजेड, उमेश शर्मा, मधुकर हरगंगे यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्याच्या सर्वांगीण विकासात करदात्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असते. त्यामुळे करदात्यांचे शोषण थांबवून त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याचा सल्ला विक्रीकर खात्यास दिला होता. त्याचे चांगले परिणामही आता दिसत आहेत. करदात्यांना सन्मान मिळवून देण्याच्या हेतूने कायद्यांची रचना केली जात आहे. अभयदानसारखी योजना त्याचाच भाग आहे. द्विअर्थी कायदेही बदलल्या जात आहेत. तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून मानवी हस्तक्षेप, संपर्क येणार नाही याची दक्षता घेतली जात असून, त्यामुळे पारदर्शकता आणखी वाढेल, असेही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. गेल्या वर्षीच्या भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे राज्याच्या तिजोरीवर दहा हजार कोटी रुपयांचा भार पडला. यंदा वेळेवर व सातत्यपूर्ण पाऊस झाल्यास राज्याचे दहा हजार कोटी रुपये वाचविता येतील, असेही त्यांनी नमूद केले.
रेणुका देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. इशांत कलुजा, श्वेता भारतिया यांनी सूत्रसंचालन केले. एम. देवराजा रेड्डी, उमेश शर्मा आदींची भाषणे झाली. कमलेश बाबू, अल्केश रावका, गणेश शीलवंत, योगेश अग्रवाल आदी उपस्थित होते.
निकम यांनी दिली पंचसूत्री
व्यवसाय कसा करावा, याची पंचसूत्री अॅड. उज्ज्वल निकम यांनी ‘सीए’ना दिली. कोणाच्याही दबावाला बळी पडू नका, पारदर्शकता ठेवा, हिशोबाचे अहवाल चुकीचे तयार करू नका, नियमांचे पालन करा तसेच प्रामाणिक राहा, असा सल्ला अॅड. निकम यांनी दिला. प्रत्येक व्यवसायात चुकीची कामे करणारे काही विघ्नसंतोषी लोक असतात. आपल्या व्यवसायातील अशा लोकांना उघड करण्यास पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
काळा पैसा परत येईल - रेड्डी
परदेशी बँकांमधील काळा पैसा भारतात आणण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांचे ‘आयसीएआय’चे अध्यक्ष एम. देवराजा रेड्डी यांनी पत्रकारांशी बोलताना कौतुक केले. परदेशी बँकांतील काळा पैसा परत आणणे शक्य असून, परत त्याची निर्मितीही होणार नाही, असा दावा त्यांनी केला.