वाहक-चालकांचे प्रवाशांशी साटेलोटे; एस.टी.ला तोटा !
By Admin | Updated: March 30, 2015 00:41 IST2015-03-30T00:32:31+5:302015-03-30T00:41:32+5:30
लातूर : निलंगा आगारातील नऊ मार्गावरील बससाठी १८४ चालक व १८६ वाहकांच्या कायम ड्युट्या होत्या

वाहक-चालकांचे प्रवाशांशी साटेलोटे; एस.टी.ला तोटा !
लातूर : निलंगा आगारातील नऊ मार्गावरील बससाठी १८४ चालक व १८६ वाहकांच्या कायम ड्युट्या होत्या. त्यामुळे या मार्गावरील वाहक- चालक व प्रवाशांची चांगली ओळख झाली होती़ प्रवाश्यांची आणि चालक-वाहकांची जवळीक एस.टी.चे उत्पन्न ढापणारी असल्याचे लक्षात येताच विभाग नियंत्रकांनी या मार्गावरील वाहक-चालकांच्या ड्युट्या बंद केल्या आहेत. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नात लाखाची भर पडली आहे़
निलंगा आगारातील वाहक काही प्रवाशांचे कमी पैसे घेवून प्रवाशांना इच्छित ठिकाणी विनातिकीट प्रवासाची सेवा देत होते़ त्यामुळे प्रवासी व एसटीच्या कर्मचाऱ्यात साटेलोटे सुरू असल्याची चर्चा प्रवाशातून ऐकावयाला मिळत होती़ या प्रक्रियेमुळे ‘एसटीचे साहेब खुप चांगले आहेत’ अशी प्रतिक्रिया प्रवाशातून ऐकायला मिळत होती़ ही बाब मार्ग तपासणी पथकालाही कळाली़ त्यामुळे निलंगा-औराद शहाजानी हालकी-सुगाव एम़एच- २४- ८८३४ या बसची तगरखेडा थांब्यावर तपासणी करताच या बसमधील वाहकाने एकूण प्रवाशापैकी २६ प्रवाशांना तिकीट दिले तर १३ प्रवाशांचे तिकीट न देताच कमी पैशात प्रवाशांना सेवा दिल्याचे मार्गतपासणी पथकाच्या लक्षात आले़ याबाबत पथकातील अधिकाऱ्यांनी वाहकास जाब विचारताच वाहकांच्या बाजूने तेथील कर्मचारी अधिकाऱ्याच्या अंगावरही आले़ हा प्रकार लक्षात येताच निलंगा आगाराअंतर्गत हलसी तुगाव, उदगीर, औराद शहाजानी, उजेड, अजनी, कासरसिरसी या मार्गावरील बारा वाहक-चालकांच्या फिक्स ड्युट्या बंद करून रूटींग पध्दतीने ड्युट्या सुरू केल्या आहेत. (प्रतिनिधी)