चाऱ्यावाचून गुरांचा दावणीला पीळ
By Admin | Updated: August 5, 2015 00:36 IST2015-08-05T00:14:42+5:302015-08-05T00:36:36+5:30
बीड : कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटात सापडलेला शेतकरी आता जितराबाच्या काळजीने पूरता हातबल झाला आहे. धन्यासाठी राबराब राबणारा सर्जा अन् दुभती गाय

चाऱ्यावाचून गुरांचा दावणीला पीळ
बीड : कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटात सापडलेला शेतकरी आता जितराबाच्या काळजीने पूरता हातबल झाला आहे. धन्यासाठी राबराब राबणारा सर्जा अन् दुभती गाय दावणीलाच पोटाला पिळ देते. हे बघताना बळीराजाचे काळीज पावसाअभावी करपडलेल्या पिकांसारखं करपत आहे. कुटुंबातल्या सदस्या इतकेच महत्वाचे असलेले जितराब आपल्या धन्याकडे पाहून हांबरते, तेव्हा आमचा जीव कासावीस होतो, अशा भावनिक प्रतिक्रीया शेतकऱ्यांनी दिल्या आहेत. शासनस्तरावरून पशुपालनासाठी केवळ योजना आहेत, मात्र त्यासाठी निधी नसल्याने योजनांचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना होत नाही, ही वस्तूस्थिती आहे. आज घडीला जिल्ह्यात शून्य टक्के चारा आहे. आता जणावरांना खायला द्यायचे काय? असा प्रश्न पशुमालकांपुढे उभा ठाकला आहे. जनावरांना उसाचे वाढे व उस कांड्या खाऊ घातल्याने जनावरांच्या आरोग्याचे प्रश्न उपस्थित होऊ लागले असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आता ‘जितराब जगवायचं कसं’ असा सवाल जिल्हयातील साडेआठ लाख पशुमालकांनी उपस्थित केला असून याचे उत्तर आज घडीला प्रशासनाकडे देखील नाही. याबाबत जिल्हयातील परिस्थितीचा घेतलेला आढावा... पशुपालनाला व शेतकऱ्यांच्या कृषी व्यावसायाला चालना मिळावी यादृष्टीकोणातून राष्ट्रीय कृषी विकास योजना शासनाने सुरू केली. या योजने अंतर्गत गतवर्षी तीन कोटी रूपयाचा निधी मंजूर करून शेतकऱ्यांसाठी एकूण ११० कडबाकुटी वाटप केल्या.मात्र यंदा बळीराजा दुष्काळाच्या परिस्थितीत होरपळत असताना देखील शासनाने राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत निधी दिलेला नाही. ४आजवर झाड पाल्याला तोंड न लावणाऱ्या जनावरांना अक्षरश: लिंबाचा पाला टाकण्याची वेळ आली आहे. पशुमालक जड अंत:करणाने जितराबांना झाडपाला टाकत आहेत. या दिवसात शेतकऱ्याकडे कडब्याची गंज असते. मात्र यंदा दुष्काळाने उध्वस्त झालेल्या बळीराजाला आपल्या लाडक्या जितराबांना कडू लिंबाचा पाला टाकण्याची वेळ आली आहे. अशी बिकट परिस्थिती जिल्ह्यात असताना देखील एकही छावणी शासनाने उभारली नाही. जिल्ह्यातल्या आठ लाख जितराबांच्या पोटाचा पिळ ना शासनाला दिसतोय.. ना जिल्ह्यातल्या पुढाऱ्यांना...