कारभारीनबाई जोरात !

By Admin | Updated: April 4, 2015 00:35 IST2015-04-04T00:16:19+5:302015-04-04T00:35:26+5:30

संजय तिपाले / व्यंकटेश वैष्णव, बीड नापिकी, दुष्काळामुळे एकीकडे शेतकरी मृत्यूला कवटाळून स्वत:ची कायमची सुटका करुन घेत आहेत.

Carabarinebaby loud! | कारभारीनबाई जोरात !

कारभारीनबाई जोरात !


संजय तिपाले / व्यंकटेश वैष्णव, बीड
नापिकी, दुष्काळामुळे एकीकडे शेतकरी मृत्यूला कवटाळून स्वत:ची कायमची सुटका करुन घेत आहेत. महिला शेतकरी मात्र, मोठ्या हिंमतीने संकटाशी दोन हात करत घामाचे मोती पिकवत आहेत. जिल्ह्यात तब्बल ७० टक्के महिलांकडे शेतीव्यवसायाची जबाबदारी आहे. फवारणीपासून ते नांगर हाकण्यापर्यंतची पुरुषांची कामेही काही जणी करतात. नियोजनाच्या जोडीला कठोर श्रमाची तयारी ठेवल्याने कारभाऱ्यांना कारभारनी भारी ठरत आहेत. शुक्रवारी ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणातून हा निष्कर्ष समोर आला.
‘शेतीव्यवस्थापनात महिलांचे योगदान’ हा विषय घेऊन ‘लोकमत’ने महिला शेतकऱ्यांना प्रश्नावलीच्या माध्यमातून बोलते केले. विविध क्षेत्रांत महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने भरारी घेतली आहे. शेतीव्यवसायातही महिला मागे नाहीत. काही महिलांनी तर आधुनिक तंत्रज्ञान, सेंद्रीय शेती, शेतीपुरक व्यवसाय सुरु करुन छाप सोडली आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नी तर आभाळाएवढे दु:ख बाजूला सारुन संसारासोबतच शेतीचा गाढा ओढत असतात.
उल्लेखनीय म्हणजे महिलांनी पारंपरिक पीकपद्धतीला फाटा देत नाविन्यपूर्ण पिके घेत शेतीला प्रतिष्ठा मिळवून दिली आहे.
तिच्या नशिबी फक्त राबणेच!
शेतीमालातून मिळणाऱ्या पैशांचा व्यवहार कोणाकडे असतो? असा प्रश्न महिलांना विचारला तेंव्हा ५० टक्के महिलांनी पतीकडे असे उत्तर दिले. ३० टक्के महिलांनी मुलगा असे उत्तर नोंदविले. केवळ २० टक्के महिला अशा आहेत, ज्या स्वत: राबतात अन् व्यवहारही पाहतात. त्यामुळे बहुतांश महिलांच्या नशिबी केवळ काबाडकष्ट उपसणेच आहे. व्यवहारातील एखाद्या निर्णयात महिलांना सामावून घेतले जात नाही. त्यामुळे उत्पन्न, खर्च, कर्ज...? या साऱ्या बाबींपासून महिला अनभिज्ञ असतात. फक्त मीठ, मिरची अन् दवाखान्यापुरतेच पैसे कारभारनींच्या हातावर टेकवतात.
कर्ज नको रे बाबा..!
‘कृषीव्यवसायाचे व्यवस्थापन सांभाळताना काय केले पाहिजे?, उत्पन्नातून मिळणाऱ्या पैशांचे नियोजन कसे हवे?’ असा खुला प्रश्न होता. यामध्ये मते नोंदविताना महिलांनी शेतीवर होणारा अवास्तव खर्च रोखण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. उत्पन्नातून मिळणारा पैसा बचत केला पाहिजे, असेही महिलांना वाटते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन व्यवसायात भरभराट करण्यासाठी महिला उत्सूक आहेत. कर्ज नकोच ... असे म्हणत उसणे पैसे उपलब्ध करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
कृषी व्यवसायाचा कारभार पाहताना कुटुंबाकडे दुर्लक्ष होते का? या प्रश्नावर ५० टक्के महिलांनी ‘हो’ असे उत्तर दिले. थोड्याप्रमाणात दुर्लक्ष होते, असे ५० टक्के महिलांना वाटते. एकूणच महिलांनी शेती अन् नाती या दोन वेगवेगळ्या बाबी बरोबरीत साधल्या आहेत. शेतीत कष्ट उपसताना संसाराकडे दुर्लक्ष होऊ न देताना महिलांची कसोटी लागते. शेतीसाठी ६० टक्के महिला दिवसाकाठी चार तासांचा वेळ देतात. ३० टक्के महिला दोन तास राबतात तर १० टक्के महिला दिवसभर कष्ट उपसत असतात.

Web Title: Carabarinebaby loud!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.