कारला धक्का लागल्याने तरुणांनी फोडली कारची काच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:05 IST2021-01-16T04:05:32+5:302021-01-16T04:05:32+5:30

औरंगाबाद : नव्या कोऱ्या विनानंबरच्या कारला दुसऱ्या कारचालकाने कट मारल्याचा राग आल्यामुळे कारमधून उतरलेल्या दोन तरुणांनी बॅटने सिनेस्टाईलने ...

The car was hit and the youth smashed the car glass | कारला धक्का लागल्याने तरुणांनी फोडली कारची काच

कारला धक्का लागल्याने तरुणांनी फोडली कारची काच

औरंगाबाद : नव्या कोऱ्या विनानंबरच्या कारला दुसऱ्या कारचालकाने कट मारल्याचा राग आल्यामुळे कारमधून उतरलेल्या दोन तरुणांनी बॅटने सिनेस्टाईलने दुसऱ्या कारच्या समोरील आणि मागील काचा फोडल्याची थरारक घटना शुक्रवारी दुपारी शासकीय दूध डेअरीजवळ झाली. यावेळी कारमधून प्रवास करणारे कुटुंब भयभीत झाले. यावेळी वाहतूक पोलिसांनी तेथे धाव घेऊन हल्ला करणारे आणि अन्य लोकांना क्रांती चौक पोलिसांच्या ताब्यात दिले आणि कोंडलेली वाहतूक सुरळीत केली .

एखाद्या सिनेमातील प्रसंगाप्रमाणे शुक्रवारी दुपारी जनार्धन लक्ष्मण कोल्हे (रा. मंठा रोड, जालना) हे त्यांचा मावसभाऊ, भावजय आणि लहान मुलीसह महावीर चौकाकडून जालन्याकडे कारने (एमएच ४६ एन ५०९७) जात होते. त्यांच्यासोबतच विनाक्रमांकाची स्कोडा कंपनीच्या पांढऱ्या कारमधून शेख जमील (उस्मानपुरा) आणि अन्य एक तरुण जात होते. या दरम्यान त्यांच्या कारला कोल्हे यांच्या कारचा धक्का लागला. नव्या कोऱ्या कारला धक्का लागल्याचे पाहून दोन्ही तरुण संतप्त झाले आणि त्यांनी पुढे शासकीय दूध डेअरी चौकाजवळ कोल्हे यांना कार रोखण्यास सांगितले. कोल्हे यांनी कार थांबविताच कारमधून उतरलेल्या दोन तरुणांनी क्रिकेट बॅटने कोल्हे यांच्या कारवर जोरदार हल्ला चढवून कारच्या सर्व काचांचा चुरडा केला. यामुळे कोल्हे यांच्या कारमधील त्यांचे नातेवाईक महिला आणि लहान मुलीने आरडाओरड केली. या घटनेमुळे दूध डेअरीसमोर रस्त्यावर वाहनचालकांनी वाहने थांबविल्यामुळे वाहतूक थांबली.

चौकट

क्रांती चौक पोलिसांनी ताब्यात घेऊन नेले ठाण्यात

दूध डेअरी चौकात वाहतूक नियमन करणाऱ्या सहायक फौजदार जाधव, गायकवाड, हवालदार अंकुश टेकाळे यांनी तेथे धाव घेतली आणि घटनेची माहिती क्रांती चौक पोलिसांना कळविली. पोलिसांनी तेथे धाव घेऊन दोन्ही कार आणि त्यातील लोकांना ठाण्यात नेले.

====================

...अन्‌ माफी मागून दिली नुकसानभरपाई?

कार फोडणाऱ्या तरुणांनी पोलीस ठाण्यात गेल्यावर कोल्हे यांची माफी मागून त्यांच्याविरुद्ध तक्रार करू नका, अशी विनंती केली. एवढेच नव्हे तर त्यांच्या कारच्या केलेल्या नुकसानीच्या भरपाईविषयी आपसांत तडजोड केल्याने कोल्हे यांनी त्या कारचालकाविरुद्ध तक्रार नसल्याचे पोलिसांना लिहून दिल्याचे पोलीस निरीक्षक डॉ. जी. एच. दराडे यांनी सांगितले.

Web Title: The car was hit and the youth smashed the car glass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.