भिकेसाठी लहानगे बनले भांडवल

By Admin | Updated: April 21, 2016 00:44 IST2016-04-21T00:07:54+5:302016-04-21T00:44:30+5:30

संतोष हिरेमठ, औरंगाबाद रेल्वेस्टेशन रोडवरील पंचवटी चौक

Capitalized capital for the bereavement | भिकेसाठी लहानगे बनले भांडवल

भिकेसाठी लहानगे बनले भांडवल

संतोष हिरेमठ, औरंगाबाद                                                                                                                                    रेल्वेस्टेशन रोडवरील पंचवटी चौक, वेळ दुपारच्या दीडची...हिरवा सिग्नल लाल होतो आणि वाहनांची चाके थांबतात...तितक्यात रस्त्यावर उभी असलेली महिला कडेवरील चिमुकल्या मुलीला सांभाळत गाडीच्या काचेवर टकटक करते... लहान मुलीच्या चेहऱ्यावरील केविलवाणे हावभाव पाहून गाडीतील व्यक्ती पटकन नाणी काढून महिलेच्या हातावर देतो...अन् महिला पुढच्या वाहनाकडे रवाना होते. शहरातील चौकाचौकांत गेल्या काही वर्षांपासून हे दृश्य सहजपणे दिसत आहे; परंतु त्याकडे फारसे कोणाचे लक्ष जात नाही. एका राजस्थानी दाम्पत्याने भीक मागून पैसे कमावण्यासाठी चक्क तीनवर्षीय चिमुकल्या मुलीच्या प्रेताचाच वापर केला. पदराखाली चिमुकलीचे प्रेत दडवून ती आजारी असल्याचे भासवत ‘माय-बाप दया करा, पैसे द्या, ही आजारी आहे, दवाखान्यात न्यायचे, पैसे द्या हो’ असे भावनिक आवाहन करीत हे दाम्पत्य मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील सिग्नलवर भीक मागत होते. पोलिसांच्या ‘दामिनी’पथकाच्या सतर्कतेमुळे हे धक्कादायक अन् मानवजातीला काळिमा फासणारे कृत्य उजेडात आले; परंतु हा प्रकार इथेच थांबलेला नाही. शहरातील चौकाचौकांत, सिग्नलवर चिमुकल्यांना कडेवर घेऊन भीक मागणाऱ्या महिला अजूनही सर्रास दिसून येत आहे. शहरात मंगळवारी उघडकीस आलेल्या घटनेनंतरही बुधवारी पंचवटी चौकात अशीच एक महिला कडेवर लहान मुलगी घेऊन वाहनधारकांकडे पैसे मागत होती. सिग्नल लागल्यावर थांबणाऱ्या वाहनधारकांना पैसे घेतल्याशिवाय सोडत नव्हती. विचित्र हावभाव करीत होती, वाहनधारकांच्या पायाला स्पर्श करीत होती. त्यामुळे अनेक जण पैसे देऊन मोकळे होत होते, तर अनेकांना हा प्रकार चुकीचा वाटत असल्याने बोलायला सुरुवात के ली; परंतु लाल दिवा हिरवा होत असल्याने वाहन पुढे नेण्याशिवाय पर्याय राहत नव्हता. प्रशासनाचे दुर्लक्ष रेल्वेस्टेशन, बसस्थानक परिसर, उड्डाणपूल खालील जागा, फुटपाथ अशा ठिकाणी भिकाऱ्यांनी बस्तान मांडले आहे. भिकाऱ्यांकडून भिकेसाठी लहान मुलांचा वापर होत आहे. जेवढे लहान मुले तेवढी अधिक श्रीमंत अशी समजूत झाली आहे. ‘एक रुपया दे दे बाबा’..‘तुम्हारे बाल बच्चे सुखी रहेंगे’... अशा आर्जवासह पदराआड असलेल्या चिमुकल्यांना पुढे करून महिला पैसे मागत आहेत, अशा भिकाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ‘भिकारी उदंड जाहले, पण प्रशासन थंडच राहिले’ अशीच परिस्थिती दिसून येत आहे. चिमुकल्यांचा वापर करणाऱ्यांना रोखण्याकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होत आहे. लहानगे मिळतात भाड्याने? चिमुकल्यांमुळे भीक अधिक मिळते. त्यामुळे त्यांना भिकेसाठी भाड्याने देण्याचा प्रकार सुरू आहे. त्यासाठी टोळीच कार्यरत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. रणरणत्या उन्हात चिमुकले निपचिप महिलेच्या कडेवर झोपलेली दिसून येतात. त्यामुळे अशी मुले अनोळखी महिलेच्या कडेवर रडू नये म्हणून थेट त्यांना गुंगीचे औषध दिले जात असल्याची शक्यता आहे. नाण्याऐवजी थेट नोट चिमुकल्यांकडे दयेच्या नजरेने पाहून त्यांच्या हातात एखाद्या नाण्याऐवजी थेट दहाची नोट ठेवणारे शेकडो दयावान भिकाऱ्यांना भेटतात. त्यामुळे भिकेसाठी चिमुकल्यांना एक प्रकारे भांडवलच बनविले आहे. पंचवटी चौकातील महिलेच्या हातातही अनेकांकडून थेट नोट टेकविली जात होती. चिमुकलीची अवस्था पाहून प्रत्येक वाहनधारकाचे मन हेलावत होते; परंतु या महिलेचे मात्र मुलीकडे लक्षही नव्हते. नाण्याऐवजी नोट मिळण्यावरच भर होता, अशा प्रकारे चिमुक ल्यांना कडेवर घेऊन फिरणाऱ्या महिलांची संख्या वाढतच आहे.

Web Title: Capitalized capital for the bereavement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.