उमेदवारीचा तिढा अद्यापही कायम
By Admin | Updated: September 16, 2014 01:31 IST2014-09-16T00:36:27+5:302014-09-16T01:31:06+5:30
जालना : जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या विरोधात घनसावंगीतून तुल्यबळ उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरावे तरी कोणाला, असा शिवसेना पक्षश्रेष्ठींसमोर प्रश्न उभा राहिला आहे.

उमेदवारीचा तिढा अद्यापही कायम
जालना : जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या विरोधात घनसावंगीतून तुल्यबळ उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरावे तरी कोणाला, असा शिवसेना पक्षश्रेष्ठींसमोर प्रश्न उभा राहिला आहे.
जिल्ह्यातील पाचपैकी तीन मतदारसंघातील लढतीचे चित्र जवळपास स्पष्ट आहे. विशेषत: जालना, भोकरदन व परतूर या तीन मतदारसंघात मातब्बर असे प्रतिस्पर्धी उमेदवार निश्चित आहेत. पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या संकेतानंतरच ते कामाला लागले आहेत. या प्रतिस्पर्ध्यांची उमेदवारी अधिकृतरित्या जाहीर होणे एवढाच सोपास्कार बाकी आहे. त्यामुळेच जालना, भोकरदन व परतूरमधून सत्तारुढ व विरोधी पक्षाचे प्रतिस्पर्धी उमेदवार गेल्या एक दीड महिन्यापासून उमेदवारी पटकावल्याच्या थाटातच मोर्चेबांधणीत दंग आहेत. जालन्यातून विद्यमान आ. कैलास गोरंट्याल, माजीमंत्री अर्जुन खोतकर हे दोघे मातब्बर एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून उभे राहिले आहेत. भोकरदनमधून विद्यमान आमदार चंद्रकांत दानवे हे पुन्हा रिंगणात उतरणार हे स्पष्ट आहे. तेथून दानवेंविरुध्द दानवेच अशी लढाई होणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे सुपूत्र संतोष दानवे हेच रिंगणात उतरतील असे स्पष्ट संकेत आहेत. परतूरमधून आ. सुरेश जेथलिया हे कॉँग्रेसचे उमेदवार असणार आहेत. चार दिवसांपूर्वीच ते कॉँग्रेसवासी झाले. उमेदवारी पटकविण्यासह. भाजपाचे जिल्हाध्यक्ष बबनराव लोणीकर हे तेथून पुन्हा जेथलियांविरोधात रणशिंग फुंकणार हे स्पष्ट आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे हे लोकसभा निवडणुकीपासूनच घनसावंगीत मोर्चेबांधणीत व्यस्त आहेत. परंतू त्यांच्या विरोधात शिवसेना तुल्यबळ उमेदवार म्हणून कोणास रिंगणात उतरवणार असा प्रश्न उभा राहिला आहे. लोकसभा निवडणूकीत तेथून शिवसेनेने मताधिक्य पटकाविल्यानंतर सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे मनोबलसुध्दा उंचावले खरे. परंतू शिवसेना पक्षश्रेष्ठी उमेदवाराबाबत द्विधा मनस्थितीत जाणवत आहे.
माजी आ. शिवाजीराव चोथे हे स्वत:स उमेदवारी मिळावू म्हणून प्रयत्नशील आहेत. तर समाजवादी पक्षास सोडचिठ्ठी देवून बाहेर पडलेले माजी आ. विलासराव खरात हे शिवसेनेकडून उमेदवारीसाठी ‘मातोश्री’च्या वाऱ्या करीत आहेत. हे दोघेही एनकेन प्रकारे उमेदवारीसाठी प्रतिष्ठा करीत असल्याने कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत. निवडणूक जाहीर झाल्यानंतर सुध्दा उमेदवारीचा तिढा कायम आहे.
बदनापूरातून शिवसेनेचे विद्यमान आ. संतोष सांबरे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मात्र त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून कोणास उमेदवारी मिळेल, हे स्पष्ट नाही. माजी नगराध्यक्ष बबलू चौधरी मोर्चेबांधणीत दंग आहेत. तेच प्रतिस्पर्धी म्हणून आघाडीवर आहेत. परंतू राष्ट्रवादीअंतर्गत अन्य इच्छूकांनी त्यांच्या विरोधात मोर्चेबांधणीत स्वत:च्या उमेदवारीसाठी मुंबई, दिल्लीच्या वाऱ्या सुरु केल्या आहेत. (प्रतिनिधी)
कॉँग्रेस आघाडीसह महायुतीतील जागा वाटपाचा तिढा अद्याप पर्यंत न सुटल्याने मित्र पक्षातील इच्छुकांच्या भुवया उंचावल्या आहेत. स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा निर्णय झाल्यास संधी मिळू शकेल म्हणून या जिल्ह्यातील दबा धरुन बसलेल्या इच्छूकांच्या आशा-आकांक्षा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत.
४मुंबई, दिल्लीतील या घडामोडींवर जोपर्यंत पडदा पडणार नाही, तोपर्यंत जागा सोडून घेण्यासह उमेदवारीसाठी किल्ला लढविण्याचा संकल्प या इच्छूकांनी केला आहे.