एक महिन्यांपासून उमेदवारांना नियुक्तीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:05 IST2021-04-30T04:05:22+5:302021-04-30T04:05:22+5:30
गंगापूर : येथील कोविड केंद्रातील रिक्तपदांसाठी आरोग्य विभागाकडून १ एप्रिल रोजी मुलाखती घेतल्या गेल्या. यात निवड झालेले उमेदवार एक ...

एक महिन्यांपासून उमेदवारांना नियुक्तीची प्रतीक्षा
गंगापूर : येथील कोविड केंद्रातील रिक्तपदांसाठी आरोग्य विभागाकडून १ एप्रिल रोजी मुलाखती घेतल्या गेल्या. यात निवड झालेले उमेदवार एक महिन्यांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांच्यासाठी मुलाखती 'एप्रिलफुल' तर ठरल्या नाही ना अशी चर्चा सुरू झाली आहे, तर कोविड काळात कर्मचाऱ्यांची गरज असताना अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्याअभावी प्रक्रिया रखडल्याचे सांगण्यात येत आहे. परिणामी कार्यरत कर्मचाऱ्यांवर मात्र कामाचा ताण वाढला असल्याचे चित्र दिसून येत आहे.
फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तालुक्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण गंगापूर तालुक्यात आढळल्याने येथील उपजिल्हा रुग्णालयाद्वारे अपुरी आरोग्य कर्मचारी संख्या लक्षात घेऊन साथरोग (कोविड-१९) आनुषंगाने कंत्राटी तत्त्वावर तीन महिन्यासाठी वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, एक्स-रे तंत्रज्ञ, औषधनिर्माता, डाटा एन्ट्री ऑपरेटर व वॉर्डबॉय अशा एकूण २७ जागांसाठी १ एप्रिल रोजी मुलाखती पार पडल्या होत्या. तालुक्यात एक महिन्यात रुग्ण झपाट्याने वाढले असतानाही निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्त्या मुख्याधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्यधिकारी व जिल्हाधिकारी ई स्वाक्षऱ्याअभावी अडकून पडल्या आहे. उपजिल्हा रुग्णालयात रुग्णसंख्या वाढत असताना आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या आपत्कालीन निधी संपल्याने रखडल्या असल्याचे बोलले जात आहे.
वैजापूर कोविड केंद्राचा अतिरिक्त ताण
गंगापूरात अशी परिस्थिती असताना त्यात भर म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी येथील वैद्यकीय अधीक्षकांना वैजापूर कोविड केंद्रास दिवसातून तीन तास काम करण्याचे आदेश दिले आहेत. गंगापूर येथून ये-जा करण्यास त्यांचे दोन ते अडीच तास जात आहेत. येथील कोविड केंद्रास ते किती वेळ देऊ शकतील? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.