संसद सचिवासाठी उमेदवारांची ‘फिल्डिंग’
By Admin | Updated: September 4, 2014 01:26 IST2014-09-04T00:41:02+5:302014-09-04T01:26:35+5:30
बीड : राजकीय पक्षांचे राजकारण आणि महाविद्यालयातील राजकारण यांची तुलना आता जवळपास समजली जाते. सध्या महाविद्यालयाचा संसद सचिव होण्यासाठी विद्यार्थ्यांनी

संसद सचिवासाठी उमेदवारांची ‘फिल्डिंग’
बीड : राजकीय पक्षांचे राजकारण आणि महाविद्यालयातील राजकारण यांची तुलना आता जवळपास समजली जाते. सध्या महाविद्यालयाचा संसद सचिव होण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपले अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केले आहेत. विजयी होण्यासाठी उमेदवारांनी जोरात फिल्डींग लावली असल्याचे दिसून येत आहे.
नुकत्याच लोकसभा निवडणुका संपल्या आहेत. या निवडणुकांमध्ये विद्यार्थ्यांनी राजकारण कसे असते हे अनुभवले. आता लोकसभा निवडणूक संपल्या असून विधानसभेची जय्यत तयारी राजकीय स्तरावर केली जात आहे. विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी महाविद्यालयातील संसद सचिवाच्या निवडणुका पार पडणार आहेत. प्रत्येक महाविद्यालयातील वर्ग प्रतिनिधींची निवड जवळपास करण्यात आली आहे. आता प्रत्येकाला वेध लागले आहे, संसद सचिवाच्या निवडणुकीचे. कोण होणार संसद सचिव? काय काम करणार? कोणाकडे विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्याची क्षमता आहे. यासारखे अनेक मुद्दे लक्षात घेऊन वर्गप्रतिनिधी आपले अमूल्य मत देणार आहेत.
आपणच संसद सचिव होणार असा विश्वासही अनेक उमेदवारांनी व्यक्त केला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रत्येकजण आपआपली व्युहरचना आखू लागला आहे़ प्रत्येकजण वर्ग प्रतिनिधींशी संपर्क वाढवू लागला आहे़ वर्ग प्रतिनिधीही उमेदवारांच्या संपर्कात असल्याचे दिसून येत आहे.
१ सप्टेंबर रोजी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होती. त्यानंतर ५ वाजेपर्यंत अर्जांची छाननी झाली. गुरुवारी उमेदवारांनी भरलेला फॉर्म माघार घेण्याची शेवटची तारीख आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवार आपला अर्ज माघारी घेऊ शकतो, असे डॉ. अमोल पालकर यांनी सांगितले.
१५ सप्टेंबरला मतदान
संसद सचिवाच्या निवडीसाठी १५ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा ते एक दरम्यान मतदान प्रक्रिया चालणार आहे. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अमोल पालकर, प्रा. अनिल चिंधे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचे प्रश्न संसद सचिवांनी सोडवावेत, त्यांच्याशी मिळून मिसळून रहावे, असा संसद सचिव वर्ग प्रतिनिधींनी निवडावा, असे प्राचार्य डॉ. वसंत सानप यांनी सांगितले.
गुरुवारी दुपारी अर्ज कोण माघारी घेणार आणि कोण ठेवणार? हे पाहण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता लागली असल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)