भरतीला उमेदवारांची दांडी

By Admin | Updated: June 7, 2014 00:26 IST2014-06-06T23:36:30+5:302014-06-07T00:26:19+5:30

नांदेड : जिल्हा पोलिस दलात ७२ जागांसाठी शुक्रवारपासून भरती प्रक्रिया सुरु झाली आहे़

Candidate's Dandi | भरतीला उमेदवारांची दांडी

भरतीला उमेदवारांची दांडी

नांदेड : जिल्हा पोलिस दलात ७२ जागांसाठी शुक्रवारपासून भरती प्रक्रिया सुरु झाली आहे़ पहिल्या दिवशी शारिरीक क्षमता आणि कागदपत्रांची पडताळणी व चेस्ट क्रमांकाचे वाटप करण्यात आले़ परंतु आज बोलाविण्यात आलेल्या ९०० उमेदवारांपैकी तब्बल ३०० हून अधिक उमेदवारांनी दांडी मारली आहे़
नांदेडचे तापमान सध्या ४२ अंशावर आहे़ त्यामुळे भरती प्रक्रियेतील सर्व चाचण्या उन्हाचा पारा वाढण्यापूर्वीच उरकण्यावर अधिक भर देण्यात आला होता़ त्यासाठी पहाटे पाचपासूनच भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली होती़ रिक्त असलेल्या ७२ जागांसाठी पुरुष व महिला मिळून एकुण १९८५ उमेदवारांनी आवेदन पत्र दाखल केले आहे़ शुक्रवारी पहिल्या दिवशी त्यातील ९०० उमेदवारांना उंची, छाती आणि कागदपत्रांच्या पडताळणीसाठी बोलाविण्यात आले होते़
परंतु आजची भरती प्रक्रिया संपण्याच्या वेळेपर्यंत फक्त ५६० उमेदवारांनीच भरतीत सहभाग घेतला होता़ त्यात तीनशेहून अधिक जणांनी मात्र भरती प्रक्रियेला दांडी मारली़ दररोज ६०० उमेदवारांना शारिरीक क्षमता आणि कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविण्यात येत आहे़ ७ आणि ८ जूनपर्यंत ही प्रक्रिया सुरु राहणार आहे़ त्यानंतर १०,११ व १२ जून रोजी मैदानी चाचणी होणार आहे तर १५ जून रोजी लेखी परिक्षा घेण्यात येणार आहे़
या सर्व भरती प्रक्रियेवर सीसी टिव्हीचा वॉच राहणार आहे़ उमेदवारांना उन्हाचा त्रास होवू नये म्हणून मैदानावर सावलीची व्यवस्था करण्यात आली होती़ तसेच पिण्याचे पाणी आणि प्रथमोपचारसाठीही वेगळी सोय होती़
कागदपत्रांची पडताळणी करण्यात उमेदवारांची तारांबळ उडू नये म्हणून प्रवर्गनिहाय खिडक्या सुरु करण्यात आल्या होत्या़ त्यामुळे काही मिनिटातच उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करणे शक्य झाले़ त्यामुळे भरती प्रक्रियेत सहभागी झालेल्या उमेदवारांनी समाधान व्यक्त केले आहे़(प्रतिनिधी)
वरिष्ठांकडून उमेदवारांच्या शंकाचे निरसन
काही उमेदवारांनी आपली उंची, छाती मोजमापाच्या बाबतीत तक्रार केल्यास पोलिस अधीक्षक परमजितसिंह दहिया, अप्पर पोलिस अधीक्षक तानाजी चिखले, सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज देशमुख हे स्वताहा संबधित उमेदवारांची दुसऱ्यांदा उंची आणि छाती मोजत असल्याचे पहावयास मिळाले़
कागदपत्रे पडताळणी करीत असताना किंवा एखादा अर्ज भरताना उमेदवारांना काही अडचणी आल्यास या ठिकाणचे पोलिस कर्मचारी त्यांना मार्गदर्शन करीत असल्याचे पहावयास मिळाले़ तसेच पडताळणी दरम्यान, कागदपत्राची झेरॉक्स कमी पडली अन ती आणण्यासाठी बाहेर जायचे असल्यास येथील एक कर्मचारी उमेदवासोबत देण्यात येत आहे़

Web Title: Candidate's Dandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.