अधिवेशनवारीमुळे विद्यार्थी वाऱ्यावर
By Admin | Updated: February 2, 2016 00:27 IST2016-02-02T00:16:36+5:302016-02-02T00:27:21+5:30
उस्मानाबाद : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने नवी मुंबईतील पटनी मैदानावर आयोजित त्रैमासिक अधिवेशनासाठी जिल्ह्यातील

अधिवेशनवारीमुळे विद्यार्थी वाऱ्यावर
उस्मानाबाद : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने नवी मुंबईतील पटनी मैदानावर आयोजित त्रैमासिक अधिवेशनासाठी जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनीही हजेरी लावली आहे़ एकाच शाळेतील अनेक शिक्षक गेल्याचा प्रकार समोर येत आहे. एकट्या कळंब तालुक्यातील ६९८ पैकी ४६७ तर भुम तालुक्यातून ४४६ पैकी २४१ शिक्षक अधिवेशन वारीवर गेले आहेत. तर वाशी तालुक्यातील ३१२ पैकी २२४ शिक्षक शाळेवर नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे़
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नवी मुंबईतील पटनी मैदानावर त्रैमासिक अधिवेशन भरविण्यात आले आहे़ या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी शिक्षकांना आॅन ड्युटी रजा मंजूर करण्यात आली आहे़ मात्र, ग्रामविकास खात्याचे याबाबत कोणतेही आदेश नसताना अनेक जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक अधिवेशनाच्या नावाखाली शाळेवर गैहजर राहिल्याचा प्रकार जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये दिसून आला़ विशेषत: कळंब, भूम, वाशी परिसरातील अनेक शिक्षकांनी या अधिवेशनाच्या नावावर शाळेकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले़ कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील आठ तर माध्यमिक शाळेतील १० असे १८ शिक्षक सोमवारी गैरहजर असल्याचे दिसून आले़ हा प्रकार शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य महादेव शेळके यांनी पाहणी केल्यानंतर समोर आला़
शेळके यांनी याबाबत तत्काळ जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आनंद रायते यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली़ रायते यांनी या प्रकरणात तक्रार द्या, कारवाई करू, असे सांगितल्याची माहिती शेळके यांनी दिली़ तर सांजा येथील पालक प्रविण वसुदेव सूर्यवंशी, सुरेश संग्राम भोसले या पालकांनीही अनधिकृतपणे शाळेवर गैरहजर राहणाऱ्या शिक्षकांवर प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी केली आहे़ दरम्यान, शिक्षण विभागाने पर्यायी शिक्षकांची नियुक्ती करावी, अशीही मागणी जोर धरत आहे.
याबाबत शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, अधिवेशनाबाबत अगोदर सर्व शाळांबाबत पत्रक काढले होते़ मात्र, दुसरे पत्र खासगी शाळांबाबत काढले असून, शाळा बंद राहणार नाहीत व शिक्षक गैरहजर राहणार नाहीत याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर सोपविण्यात आली आहे़ शिक्षक अधिवेशनाला गेल्यानंतर पर्यायी व्यवस्था करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत़ मुख्याध्यापकांनी कामात कुचराई केली तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे़ अधिवेशनाला किती शिक्षक गेले याची माहिती मागविण्यात आली आहे़ जे शिक्षक अनधिकृतपणे अधिवेशनाला गेले असतील त्यांची रजा ही त्यांच्या अर्जित रजेत वर्ग करण्यात येणार आहे़ शिवाय त्यांच्या सेवा पुस्तिकेवरही याची नोंद करण्यात येणार असल्याचेही जगताप यांनी सांगितले़