वालूरमधील केरोसीन परवाना रद्द
By Admin | Updated: April 22, 2016 00:24 IST2016-04-22T00:22:40+5:302016-04-22T00:24:17+5:30
परभणी : वालूर येथील केरोसीन परवानाधारकांची चौकशी केल्यानंतर अनेक दोष आढळल्याने सदर परवानाधारकांचा परवाना रद्द करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी काढले आहेत़

वालूरमधील केरोसीन परवाना रद्द
परभणी : सेलू तालुक्यातील वालूर येथील केरोसीन परवानाधारकांची चौकशी केल्यानंतर अनेक दोष आढळल्याने सदर परवानाधारकांचा परवाना रद्द करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी काढले आहेत़
वालूर येथील अर्धघाऊक केरोसीन परवानाधारक सुरेंद्र भगीरथ तोष्णीवाल यांच्याविषयी जिल्हा पुरवठा विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या़ त्यावरून पाथरीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी चौकशी करून ७ एप्रिल रोजी अहवाल पाठविला होता़ या चौकशीत अनेक दोष आढळून आले़ त्यात शासनाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे केरोसीनचे वितरण न करणे, कमी केरोसीन वितरित करणे, द्वारपोच योजनेंतर्गत ५० टक्के केरोसीन वितरित न करणे, किरकोळ परवाना धारकांना आरेरावीची भाषा वापरणे, अनावश्यक ३१ हजार ५०० लीटर केरोसीन परवानाधारकास वितरित न करता स्वत:जवळ ठेवणे, अभिलेखे अपूर्ण ठेवणे असे दोष आढळले आहेत़ हे दोष गंभीर स्वरुपाचे असल्याचा निष्कर्ष काढत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी २१ एप्रिल रोजी सुरेंद्र तोष्णीवाल यांचा अर्धघाऊक केरोसीन परवाना रद्द करण्याचा आदेश दिला आहे़ तसेच परवान्यापोटी जमा असलेली संपूर्ण अनामत रक्कम जप्त केली आहे़ (प्रतिनिधी)