‘समांतर’चे कंत्राट रद्द करा!

By Admin | Updated: June 28, 2016 00:59 IST2016-06-28T00:46:15+5:302016-06-28T00:59:53+5:30

औरंगाबाद : बहुचर्चित समांतर जलवाहिनी प्रकल्पावर गुरुवार, ३० जून रोजी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत मनपा प्रशासनाने

Cancel the parallel contract! | ‘समांतर’चे कंत्राट रद्द करा!

‘समांतर’चे कंत्राट रद्द करा!


औरंगाबाद : बहुचर्चित समांतर जलवाहिनी प्रकल्पावर गुरुवार, ३० जून रोजी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत मनपा प्रशासनाने तब्बल ३१ पानांचा खळबळजनक प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावात समांतर जलवाहिनीचा प्रकल्प औरंगाबादकरांना अजिबात परवडणारा नाही. नागरिकांसह महापालिकेवरही प्रचंड आर्थिक बोजा पडणार आहे. खाजगीकरणातून उभा राहणारा हा प्रकल्प त्वरित रद्द करण्याची शिफारस मनपा प्रशासनाने सर्वसाधारण सभेला केली आहे. प्रशासनाच्या या उघड भूमिकेमुळे सत्ताधारी शिवसेना-भाजपची मात्र, प्रचंड गोची झाली आहे.
मागील सहा महिन्यांपासून समांतर जलवाहिनीचा प्रकल्प राहणार का जाणार यावर जोरदार प्रक्रिया सुरू आहे. अखेर न्यायालयाच्या निर्देशानुसार व शासनादेशानुसार ३० जून रोजी मनपाची सर्वसाधारण सभा घेण्यात येत आहे. या सभेत समांतर जलवाहिनी प्रकल्प राहील किंवा नाही यावर अंतिम निर्णय होणार आहे. सर्वसाधारण सभेसमोर मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी ३१ पानांचा प्रस्ताव सादर केला असून, त्यामध्ये अनेक धक्कादायक बाबी प्रशासनाने मांडल्या आहेत. खिशातून एक रुपयाही खर्च न करता मनपाच्याच पैशांवर कंत्राटदार प्रकल्प राबवून अमाप पैसा कमावण्याचा विचार करीत असेल तर हे अत्यंत चुकीचे आहे.
समांतरचा सखोल अभ्यास करून आयुक्त बकोरिया यांनी सर्वसाधारण सभेसमोर एकूण २२ ठळक बाबी मांडल्या आहेत. या प्रकल्पात निव्वळ कंत्राटदाराचे हित जपण्यात आले आहे. २००६ मध्ये अवघ्या ३५९ कोटी ६७ लाख रुपयांचा प्रकल्प नंतर पीपीपी मॉडेलवर नेऊन ७९२ कोटींपर्यंत नेण्यात आला.
कंत्राटदाराला आतापर्यंत १७४ कोटी रुपये देण्यात आले असून, कंत्राटदाराने १९४ कोटी रुपये खर्च केले आहेत. अनावश्यक ठिकाणी पैशांची अक्षरश: उधळपट्टी करण्यात आली आहे. या प्रकल्पात कंत्राटदाराने आतापर्यंत किमान २५० कोटी रुपयांची स्वत:ची गुंतवणूक करणे आवश्यक होते. २१ महिन्यांमध्ये किमान ५५ ते ६० टक्के प्रकल्पाचे काम पूर्ण होणे गरजेचे होते. बाजारात कंत्राटदाराला एकाही बँकेने कर्ज दिलेले नाही. मनपा प्रशासनाने कंत्राटदाराला आवश्यकतेपेक्षा अधिक रक्कम दिलेली आहे.
मनपा प्रशासनाने ३० जून रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेसमोर समांतर जलवाहिनीचा प्रकल्प रद्द करा, असा प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे मनपातील सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीची बरीच गोची झाली आहे. आजपर्यंत शिवसेनेने या प्रकल्पासंदर्भात उघडपणे कोणतीही भूमिका घेतलेली नाही.
४महापौर व इतर पदाधिकारी यासंदर्भात अंतिम निर्णय ‘मातोश्री’वर होणार असल्याचे सांगत आहेत. यापूर्वी भाजपने समांतरला आमचा विरोध असल्याचे जाहीर केले होते. सर्वसाधारण सभेत समांतरच्या मुद्यावर मतदान घेण्याची वेळ आल्यास भाजप विरोधात मतदान करील, असे भाजप आमदाराने जाहीर केले होते.
मनपात एमआयएमसह काँग्रेस व इतर पक्षांनी यापूर्वीच समांतर जलवाहिनीचा प्रकल्प रद्द करावा, मनपाने स्वत: हा प्रकल्प राबवावा, अशी मागणी केली आहे.
मनपा सभागृहात मतदान घेण्याची वेळ आल्यास विरोधक समांतरच्या विरोधात मतदान करणार आहेत. मतदानाची वेळ आल्यास भाजपची भूमिका सर्वात महत्त्वाची ठरणार आहे.

Web Title: Cancel the parallel contract!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.