अनेक जागाही दिल्या ९९ वर्षांच्या सर्व लीज रद्द करा
By Admin | Updated: November 8, 2016 01:31 IST2016-11-08T01:24:54+5:302016-11-08T01:31:37+5:30
औरंगाबाद : महापालिकेच्या मालकीचे अनेक भूखंड ९९ वर्षांच्या करारावर देण्यात आले आहेत. हे सर्व करार त्वरित रद्द करावेत, असे आदेश

अनेक जागाही दिल्या ९९ वर्षांच्या सर्व लीज रद्द करा
औरंगाबाद : महापालिकेच्या मालकीचे अनेक भूखंड ९९ वर्षांच्या करारावर देण्यात आले आहेत. हे सर्व करार त्वरित रद्द करावेत, असे आदेश सोमवारी मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी दिले. मनपाने खरोखरच उद्या लीज रद्द केल्यास कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून उभारण्यात आलेले प्रकल्प बंद पडतील. बीओटी तत्त्वावर सर्वात जास्त भूखंड मनपाने दिले आहेत.
मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी सोमवारी सकाळी ९.३० वाजता सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. बैठकीत विविध कामांचा आढावा त्यांनी घेतला. बैठकीत लीजवर अनेक मालमत्ता देण्यात आल्याचे समोर आले. महापालिकेच्या मालकीच्या किती मालमत्ता कोणाला करारावर देण्यात आल्या आहेत, याचा तपशील सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले. ९९ वर्षांच्या करारावर असलेल्या सर्व लीज रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करा, असे आदेश मालमत्ता विभागाला दिले. आयुक्तांच्या या निर्णयाने विभागप्रमुख क्षणभर स्तब्ध झाले होते. कोणालाही काहीच बोलता येत नव्हते. या निर्णयाचे दूरगामी परिणाम काय असू शकतील याची पूर्णपणे जाणीव विभागप्रमुखांना होती. मात्र, एकाही अधिकाऱ्याने याला विरोध केला नाही. आयुक्तांच्या आदेशाचे पालन करणे हा एकमेव पर्याय त्यांच्यासमोर होता.
मागील दहा वर्षांमध्ये मनपाने बीओटी तत्त्वावर अनेक प्रकल्प राबविले. हे प्रकल्प राबविताना मनपाला कोट्यवधी रुपयांचा फायदा होईल, असे भासविण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात मनपाला लाखो रुपये मिळाले आणि ज्यांना कोट्यवधी रुपयांच्या जमिनी दिल्या त्यांना कोट्यवधींचा फायदा झाला.
४सिद्धार्थ उद्यान येथील फूड प्लाझाची जागा ९९ वर्षांच्या करारावर देण्यात आली आहे. हा प्रकल्प अजून पूर्ण झालेला नाही. शहानूरमियाँ दर्ग्यासमोर ९९ वर्षांच्या करारावर युरोपियन मार्केट तयार करण्यात आले. येथील कोट्यवधींची जागा खाजगी व्यक्तींना देण्यात आली. रेल्वेस्टेशन येथेही मनपाने बीओटीवरच शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारले. याशिवाय काही प्रकल्प ३० वर्षांच्या करारावर देण्यात आले आहेत.
महापालिकेची स्थापना झाल्यानंतर सुरुवातीच्या पाच वर्षांमध्ये अत्यंत मोक्याच्या जागा अगदी कवडीमोल भाडेतत्त्वावर विविध संस्था, संघटनांना ९९ वर्षांच्या लीजवर देण्यात आल्या आहेत. यामध्ये सिटीचौकातील बीएमसी बँक, अंजली चित्रपटगृहाजवळील सारस्वत बँक, जाफरगेट येथील शॉपिंग कॉम्प्लेक्स, रेल्वेस्टेशन भागातील जागा, औषधी भवन, श्रीमान श्रीमती, सुराणा कॉम्प्लेक्स आदी जागांचा समावेश आहे.