‘सिंचन’ची कामे रद्द की मंजूर?
By Admin | Updated: August 8, 2014 01:25 IST2014-08-08T00:55:41+5:302014-08-08T01:25:20+5:30
औरंगाबाद : सिंचन विभागाने प्रशासकीय मान्यता दिलेल्या २७ कोल्हापुरी बंधाऱ्यांची कामे रद्द करण्यात आली की नाहीत, याचे उत्तर द्या, अशी मागणी करीत

‘सिंचन’ची कामे रद्द की मंजूर?
औरंगाबाद : सिंचन विभागाने प्रशासकीय मान्यता दिलेल्या २७ कोल्हापुरी बंधाऱ्यांची कामे रद्द करण्यात आली की नाहीत, याचे उत्तर द्या, अशी मागणी करीत लाभार्थी सदस्यांनी गुरुवारी (दि. ७) जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत पाच तास ठिय्या मांडला. त्यामुळे समितीचे काहीच कामकाज होऊ शकले नाही.
काही सदस्यांच्या मागणीवरून सिंचन विभागाचे प्रभारी विभागप्रमुख गजानन रबडे यांनी २७ कामांची प्रशासकीय मान्यता रद्द केल्याचे पत्र दिले होते. या पार्श्वभूमीवर गुरुवारी आयोजित जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत पडसाद उमटणार हे स्पष्टच होते.
जि. प. अध्यक्षा शारदा जारवाल यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी १ वाजता जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीस प्रारंभ झाला. संतोष जाधव, सुदाम मोकासे, सूरज नाना पवार हे सदस्य सभागृहात घुसले व त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यामुळे बैठकीच्या कामकाजास सुरुवात होऊ शकली नाही. दुपारी १ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत अध्यक्षा, समिती सदस्य, अधिकारी व आंदोलनकर्ते तसेच बसून होते.
आम्ही सभागृहात ५ तास बसून होतो. कामे रद्द करण्यात आल्याचे पत्र द्या, कामे रद्द करण्यात आली असतील तर ही २७ कामेच का? आतापर्यंत मंजूर सर्वच कामे रद्द करा, अशी आमची मागणी आहे. कामे रद्द केल्याचे पत्र अधिकाऱ्यांनी आम्हाला दिले नाही. मंजूर २७ गटांत यापूर्वी सिंचनाचे एकही काम झालेले नाही.
-संतोष जाधव, जि. प. सदस्य.
२७ कामांना प्रशासकीय मान्यता देणारे कार्यकारी अभियंता गजानन रबडे आज कार्यालयात नव्हते. त्यामुळे सदरची संचिका आम्हाला पाहायला मिळाली नाही. त्यामुळे कामे रद्द झाली की, नाही हे सांगता येत नाही. बैठक उद्याही होणार आहे. त्यात सदर संचिका बोलावली जाईल.
-एस. बी. लांगोरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी
सिंचनाच्या काम वाटपावरून पाचही पक्षाचे सदस्य नाराज आहेत. तशा काही प्रशासकीय मान्यता निघाल्या असतील तर ते चूकच आहे. काही कामानिमित्त बाहेरगावी असल्याने मी जिल्हा परिषदेत मागे येऊ शकलो नाही. उद्या आम्ही एकत्रित बसून सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करू.
-विनोद तांबे,
गट नेता, काँग्रेस