नारळ फुटले; प्रचाराला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 00:23 IST2017-10-03T00:23:39+5:302017-10-03T00:23:39+5:30
प्रचाराचा नारळ फुटला असून, भेटीगाठींना वेग आल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

नारळ फुटले; प्रचाराला वेग
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण गावागावात तापू लागले आहे. नशीब अजमावण्यासाठी व सरपंच, सदस्यपद मिळविण्यासाठी उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सध्या प्रचाराचा नारळ फुटला असून, भेटीगाठींना वेग आल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ६९० ग्रामपंचायतींसाठी ७ आॅक्टोबर रोजी मतदान होत आहे. ६९० सरपंचपदांसाठी १९७८ उमेदवार रिंगणात उतरले आहेत तर सदस्यपदासाठी १२ हजार १८ उमेदवार रिंगणात आहेत. ग्रा.पं. निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर होताच गावागावात नियोजन सुरू झाले होते. कोणता पॅनल टाकायचा? कोणता उमेदवार उभा करायचा? यासंदर्भात बैठका घेऊन उमेदवार निश्चित करण्यात आले होते.
दरम्यान, अर्ज मागे घेतल्यानंतर खरे उमेदवार स्पष्ट झाले. त्यानंतर गावागावात भेटीगाठींना वेग आला. अनेक गावात सध्या नारळ फुटला असून, प्रचाराला वेग येत आहे. तसेच सकाळी व सायंकाळी दुचाकी रॅली काढून उमेदवारासह कार्यकर्ते प्रचार करताना पहावयास मिळत आहेत. दिवसेंदिवस प्रचाराला उमेदवार गती देताना दिसून येत असून, मतदारांमध्येही मतदानाची उत्सुकता पहावयास मिळत आहे. दरम्यान, पोलिसांकडून कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.