अवैध धंद्याविरोधात गणेशोत्सवानंतर मोहीम
By Admin | Updated: September 3, 2016 00:29 IST2016-09-03T00:23:59+5:302016-09-03T00:29:01+5:30
उस्मानाबाद : सावकारी जाचामुळे कंटाळून आत्महत्या केलेल्यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर जिल्ह्यातील सावकारीचे दुष्टचक्र पुढे आले.

अवैध धंद्याविरोधात गणेशोत्सवानंतर मोहीम
उस्मानाबाद : सावकारी जाचामुळे कंटाळून आत्महत्या केलेल्यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर जिल्ह्यातील सावकारीचे दुष्टचक्र पुढे आले. याबरोबरच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरु असल्याचे सांगत, गणेशोत्सवानंतर या विरोधात कडक मोहीम राबविण्यात येणार असल्याचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले. सावकारांचे मागील वर्षभरातील व्यवहारही तपासणार असल्याचे ते म्हणाले.
शिवसेनेच्या आठ आमदारांनी शुक्रवारी जिल्ह्यातील पीक परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर डॉ. सावंत पत्रकार परिषदेत बोलत होते. साधारणत: ६० टक्के पिके चांगली असली तरी पावसाने ओढ दिल्याने ४० टक्क्यावर पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबतचा अहवाल आमदारांकडून प्राप्त झाल्यानंतर तो पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर करणार असून, त्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेवून उपाययोजना करण्याबाबत आग्रह धरण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सद्यस्थितीत २७ गावात टँकर सुरु असून तीन गावांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. आवश्यक तेथे अधिग्रहण तसेच पाण्याचे टँकर सुरु करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
भूम, परंडा तालुक्यातील जलवाहिनीचे काम चौदाव्या वित्त आयोगातून करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असून, जिल्हा बँकेला मदत करण्याचीच शासनाची भूमिका असल्याचे ते म्हणाले. बँक कोणाच्या ताब्यात आहे याच्याशी आम्हाला देणे-घेणे नाही.
शेतकऱ्यांची बँक असल्याने मदतीसाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत चार बैठका झाल्या असल्याचे सांगत, मदतीबाबतचा निर्णय लवकरच होर्ईल असे ते म्हणाले. ठिबक सिंचनच्या अपूर्ण योजनांच्या चौकशीचे आदेश दिल्याची माहितीही त्यांनी दिली. शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत विद्यमान सरकारने केल्याचा दावा करीत, २० सप्टेंबरपर्यंत पिकांचे पंचनामे पूर्ण करण्यात येणार असून, शनिवारपासूनच यासाठीचे काम यंत्रणा सुरु करणार असल्याचे ते म्हणाले. अणदूर येथे शवविच्छेदनासाठी नातेवाईकांना १८ तास ताटकळावे लागल्याचे पत्रकारांशी डॉ. सावंत यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर जिथे प्रकाश योजना आहे तिथे रात्रीही शवविच्छेदन करण्याचे आदेश यापूर्वीच दिले आहेत. त्यानंतरही त्याकडे कोणी कानाडोळा करीत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणाले.
नवरात्रोत्सव काळात महाद्वारऐवजी घाटशीळ मार्गे दर्शनासाठी सोडण्याचा निर्णय भाविकांची सुरक्षितता लक्षात घेवूनच घेतला होता. त्याप्रमाणे गेल्या वर्षी महाद्वारासमोर कोंडीही झाली नव्हती. ही पद्धत अशीच ठेवून बाहेर पडताना भाविकांना खरेदी करता यावी, यासाठी आवश्यक तिथे कसलेही भाडे न घेता दुकाने थाटण्याची परवानगी देता येवू शकते. मात्र यासाठी सर्वमान्य तोडगा निघण्याची आवश्यकता आहे. याअनुषंगाने धार्मिक भावनाही लक्षात घेवून मंदिराशी संबंधित सर्व घटकांशी संवाद साधण्यासाठी शनिवारी बैठक घेण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केली असल्याची माहितीही पालकमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.
मुंबईत बैठक घेतल्यानंतरही जिल्हा रुग्णालयातील अनेक समस्या कायम असल्याचे पत्रकारांनी सावंत यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर जिल्हा रुग्णालयाचा कारभार तातडीने सुधारण्याची तंबी दिली असल्याचे ते म्हणाले. जिल्हा रुग्णालयातील नवीन विस्तारीत इमारतीचे उद्घाटन दिवाळीनंतर करु. आवश्यकता पडल्यास या इमारतीसाठी अधिकचा निधी देवू असेही ते म्हणाले. सदर इमारत कामासाठी २६ कोटीचे बजेट विना परवानगी वाढविले होते. त्यासाठीच्या मान्यता घेण्यात वेळ गेला. आज कामाची पाहणी केल्यानंतर काही ठिकाणी काम दर्जेदार नसल्याचे आढळून आले. त्यात सुधारणा करण्यास सांगितले असल्याचेही ते म्हणाले.
पालकमंत्री म्हणून उस्मानाबादकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात असल्याचा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर भंडारा आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्याचे पालकत्व तसेच आरोग्य विभागाचा व्याप पाहता एकाच जिल्ह्याची जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडता येवू शकते, अशी कबुली देत, मात्र याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. जिल्हा शिवसेनेमध्ये अंतर्गत गटबाजी नाही आणि काहीजण गटबाजी करीत असले तरी पक्षप्रमुखांचा आशीर्वाद असल्याने त्याची फिकीर करीत नसल्याचे सावंत यावेळी म्हणाले.