तोफा थंडावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:40 IST2017-10-06T00:40:05+5:302017-10-06T00:40:05+5:30
ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराचा गुरुवारी शेवटचा दिवस होता.

तोफा थंडावल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराचा गुरुवारी शेवटचा दिवस होता. प्रचार तोफा थंडावल्यानंतर आता उमेदवारांनी डोअर टू डोअर गाठीभेटींवर भर दिला आहे. उद्या मतदान होणार असून, निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी प्रशासनाच्या वतीने नियोजनही पूर्ण झाले आहे.
जिल्ह्यात ६९० पैकी ६५९ ग्रामपंचायतीसाठी शनिवारी मतदान होत आहे. महिनाभरापासूनच ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी गावागावात सुरु होती. जिल्ह्यात काही ग्रामपंचायत बिनविरोध आल्या असल्या तरी काही ग्रामपंचायतींत चुरशीच्या लढती पहावयास मिळत आहेत. विशेष म्हणजे काही गावांमध्ये नातेवाईकच आमनेसामने आल्याने मतदारांची अडचण झाली आहे.
निवडणूक विभागाने गुरुवारपर्यंत प्रचारासाठी परवानगी दिली होती. गुरुवारी सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. तत्पूर्वी गावागावात सकाळपासूनच दुचाकी रॅली काढून घोषणाबाजी करण्यात आली तसेच पायी फेरी ही काढण्यात आली. प्रत्येक उमेदवार शक्ती प्रदर्शन करीत डोअर टू डोअर जाऊन मतदानासाठी विनवणी करतानाचे चित्र अनेक ठिकाणी पहावयास मिळाले. सायंकाळी तोफा थंडावताच रात्री उशिरापर्यंत मतदानाचे नियोजन करण्यात पॅनलप्रमुख, उमेदवार व कार्यकर्ते व्यस्त असल्याचे दिसत होते. तसेच प्रत्येक प्रभागात त्या त्या ठिकाणचा उमेदवार मतदारांसोबत कॉर्नर बैठका घेताना दिसले.
जिल्ह्यात अति संवेदनशील १२ व संवेदनशील १९२ मतदान केंद्रे असून, १८०९ मतदान केंद्राध्यक्ष तसेच ६३३३ मतदान अधिकारी नियुक्त आहेत. ६५३ ग्रा.पं. साठी २१३३ बूथ आहेत.
निवडणूक आयोगाने निर्देशित केलेल्या १६ पैकी कोणताही एक पुरावा सादर करुन मतदारास मतदान करता येणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झाले आहे.