तुटपुंज्या निधीवर आगाराची बोळवण
By Admin | Updated: January 8, 2017 23:42 IST2017-01-08T23:42:05+5:302017-01-08T23:42:29+5:30
बीड बसस्थानकातील खड्ड्यांमुळे असह्य असा प्रवास वाहक-चालकांसह प्रवाशांना करावा लागतो

तुटपुंज्या निधीवर आगाराची बोळवण
राजेश खराडे बीड
बसस्थानकातील खड्ड्यांमुळे असह्य असा प्रवास वाहक-चालकांसह प्रवाशांना करावा लागतो. मोठ्या दुरवस्थेमुळे जिथे रस्ता पुनर्बांधणीची गरज आहे त्याठिकाणच्या खड्ड्यांवर खडी आणि दगडगोटे अंथरूण मलमपट्टी केली जात आहे. उलटार्थी दुरूस्तीसाठीे अंथरलेल्या दगड-गोट्यांमुळे सुविधांपेक्षा प्रवाशांची अडचण अधिक झाली आहे.
स्थानकाच्या प्रवेशद्वारापासून ते थेट बाहेर पडण्याऱ्या रस्त्यापर्यंतच्या परिसरात मोठ-मोठे खड्डे आणि खडी उघडी पडली आहे. स्थानकाच्या वर्दळीच्या ठिकाणी बसगाडी मार्गस्थ होताच संपूर्ण स्थानक धुळीने माखून निघत आहे. विभागीय अधिकाऱ्यांच्या पाठपुराव्याने दुरूस्ती कामांना सुरूवात झाली खरी, मात्र तुटपुंज्या निधीमुळे मलमपट्टी केली जात आहे.
मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राच्या अनुशंषाने येथील स्थानक मध्यवर्ती आहे. त्यामुळे बसगाड्यांची मोठी वर्दळ असते. शिवाय जिल्ह्याचे स्थानक असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशीही मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. वाढती प्रवाशी संख्या, यात्रोत्सव यामधून दरवर्षी लाखोंचा फायदा होत असल्याचा निर्वाळा वाहतूक अधिकाऱ्यांकडून दिला जातो. मात्र, त्यातुलनेत सोयीसुविधाही पुरविल्या जात नाहीत. अतिवृष्टीमुळे रस्त्याच्या दुरवस्थेत भर पडली होती. तब्बल चार महिन्यांनंतर का होईना दुरूस्तीला सुरूवात झाली असली तरी कामाचा दर्जा ढासळला आहे. या दुरूस्तीकरिता केवळ ४८ हजार रूपये मंजुर झाल्याने दगड-गोठे व मोठ्या खडीने खड्डे बुजून घेतले जात आहेत. काळ्या मातीच्या जमीन क्षेत्रावर स्थानक वसले असल्याने पाऊस झाला की रस्ता खचत असल्याचे सांगितले जाते. मात्र, दर्जात्मक कामच होत नसल्याने दरवर्षी पावसाळ्यात स्थानकाला तळ्याचे स्वरूप येते. हे नियमित असले तरी प्रवाशांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय होत नाहीत हे विशेष.