केज पंचायत समिती वार्‍यावर

By Admin | Updated: May 29, 2014 00:36 IST2014-05-28T23:45:34+5:302014-05-29T00:36:44+5:30

मधुकर सिरसट , केज केज पंचायत समितीच्या कारभाराने कळस गाठला असून पंचायत समिती सदस्यांनी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामाची तक्रार करताच गटविकास अधिकारी आजारी रजेवर गेले आहेत.

Cage panchayat committee warranty | केज पंचायत समिती वार्‍यावर

केज पंचायत समिती वार्‍यावर

मधुकर सिरसट , केज केज पंचायत समितीच्या कारभाराने कळस गाठला असून पंचायत समिती सदस्यांनी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामाची तक्रार करताच गटविकास अधिकारी आजारी रजेवर गेले आहेत. दरम्यान आजारी रजेवर जाताना आपला पदभार कोणाकडेही दिला नसल्यामुळे केज पंचायत समितीचा कारभार वार्‍यावर सोडण्यात आला आहे. मंगळवारी पंचायत समिती सदस्यांच्या बैठकीत ठराव घेण्यात आला. हा ठराव पुढील कार्यवाहीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी बीड यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. ते काय निर्णय घेतात. याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. केज तालुक्यात १६ ठिकाणी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून कामे चालू होती. परंतू या कामावर मजूर नसतानाही त्यांच्या नावाने मस्टर भरून संगनमताने भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप पंचायत समितीचे सदस्य वसंत केदार आणि संतोष चाटे यांनी केला होता. त्यानंतर गटविकास अधिकारी गजानन आगरते यांनी रागाच्या भरात ही सर्वच कामे बंद करण्याचे आदेश दिले. या कामावरील मजुरांची उपासमार होऊ लागल्याच्या तक्रारी येऊ लागताच गटविकास अधिकारी गजानन आगरते हे २३ मे पासून आजारी रजेवर गेले आहेत. मंगळवारी पंचायत समिती सदस्यांची बैठक शेतकरी सभागृहात झाली. यावेळीही ते गैरहजरच होते. सदस्यांनी ठराव घेऊन सभा काळात सचिवाचे काम पाहण्याचा ठराव सहायक प्रशासन अधिकारी अशोक वाघमारे यांना नावाने घेतला. त्यांनीच सभेदरम्यान कामकाज पाहिले. पंचायत समिती सदस्यांच्या बैठकीत आजारी रजा मंजूर न करताच रजेवर गेलेल्या गटविकास अधिकारी गजानन आगरते यांच्या निषेधाचा ठराव घेण्यात आला व त्यांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे, असा ठराव पंचायत समिती सदस्य वसंत केदार व संतोष चाटे यांनी मांडला. लघु पाटबंधारे विभागाचे उपअभियंता कायम गैरहजर पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर विद्यमान सदस्यांच्या कार्यकाळात जि.प.लघु पाटबंधारे विभागाचे उपअभियंता एस.ई. आंभारे हे एकदाही बैठकीला हजर राहिलेले नाहीत. त्यांना वारंवार सूचना व लेखी नोटीस देऊनही ते बैठकीला हजर राहत नाहीत. या बद्दल सदस्यांनी नाराजी व्यक्त करून कारवाईची मागणी केली. तालुक्यातील पाणी टंचाईग्रस्त ७२ गावांत एकूण ८० विंधन विहिरी घेण्यासाठी कृती आराखडाप्रमाणे मंजुरी मिळाली असतानाही चक्क पावसाळा सुरू झाला तरी एकही विंधन विहीर कोणत्याच गावात घेण्यात आली नाही. हातपंप विभागाचे पथक प्रमुख एम.व्ही.पाठक यांच्यचा निष्काळजीपणामुळे आज पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. त्यांच्या विरोधातही कार्यवाहीचा ठराव या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, आगरते यांची आजारी रजा मंजूर केली का हे विचारण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भारती यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. विभाग प्रमुख बैठकीला गैरहजर पंचायत समिती सदस्यांच्या मंगळवारच्या मासिक बैठकीला जि.प. बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता एच.आर.गालफाडे एकमेव हजर होते. बाकी सर्व विभागाचे प्रमुख या बैठकीला गैरहजर होते. त्यांच्या गैरहजेरीचा अहवालही वरिष्ठांना पाठविण्यात येणार असल्याचा ठराव घेण्यात आल्याची माहिती सहायक प्रशासन अधिकारी अशोक वाघमारे यांनी दिली.

Web Title: Cage panchayat committee warranty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.