केज नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्षासाठी चुरस
By Admin | Updated: April 28, 2015 00:30 IST2015-04-28T00:07:58+5:302015-04-28T00:30:52+5:30
केज : येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. राष्ट्रवादी, काँग्रेसचे प्रत्येकी दोन, भाजपचे एक नगराध्यक्षपदाच्या स्पर्धेत आहे

केज नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्षासाठी चुरस
केज : येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. राष्ट्रवादी, काँग्रेसचे प्रत्येकी दोन, भाजपचे एक नगराध्यक्षपदाच्या स्पर्धेत आहे. हे पद मिळविण्यासाठी श्रेष्ठींकडे लॉबिंग सुरू असून, संख्याबळाचा जादूई आकडा जुळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
नगरपंचायतीत १७ सदस्य असून, काँग्रेसने ८ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष असल्याचे सिध्द केले. मात्र, वर्चस्व सिध्द करण्यासाठी काँग्रेसला एका नगरसेवकाच्या ‘हात’भाराची गरज आहे. दुसरीकडे भाजप ५, राष्ट्रवादी २ तर अपक्ष २ असे संख्याबळ आहे. नगराध्यक्षपद मागासप्रवर्गासाठी आरक्षित आहे. त्यामुळे मातब्बरांची गोची झाली आहे. नगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम सुरू झाला असून, २४, २५ एप्रिल या दरम्यान नामनिर्देशनपत्र दाखल करावयाचे होते. त्यानुसार काँग्रेसकडून अश्विनी गाढवे, कबिरोद्दीन इनामदार, भाजपकडून हारूण इनामदार तर राष्ट्रवादीकडून सोहेरा बेगम दलील इनामदार यांनी उमेदवारी दाखल केली आहे. ३० एप्रिल ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला असून संख्याबळासाठी काँग्रेस, भाजपकडून प्रयत्न आहेत.
नगराध्यक्षपदाचा मान कोणाला मिळतो ? याकडे शहरासह तालुक्याचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)