नगराध्यक्षपदासाठी केजमध्ये चुरस
By Admin | Updated: April 12, 2015 00:42 IST2015-04-12T00:42:32+5:302015-04-12T00:42:32+5:30
केज : येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले असून पद मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव आहे. स्पष्ट बहुमताअभावी नगराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते? याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

नगराध्यक्षपदासाठी केजमध्ये चुरस
केज : येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले असून पद मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव आहे. स्पष्ट बहुमताअभावी नगराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते? याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. तूर्त नगराध्यक्ष होण्यासाठी इच्छुकांत चुरस वाढली आहे.
१८ जानेवारी २०१५ रोजी नगरपंचायतीच्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया पार पडली. १७ सदस्यांच्या या नगरपंचायतीत कुठल्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही; परंतु आठ जागा पटकावून काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. भाजपाने पाच जागा पटकावल्या तर राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ दोन जागांवरच समाधान मानावे लागले. दोन अपक्षांनीही पंचायतीत धडक मारली. निकाल जाहीर झाल्यानंतरही चार महिन्यांपासून आरक्षण जाहीर नव्हते. नगरसेवक होऊनही धोरणात्मक निर्णय घेणे कठीण बनल्याने केजकरांचे लक्ष आरक्षण सोडतीकडे होते. नगराध्यक्षपद इतर मागासप्रवर्गासाठी राखीव आहे. या प्रवर्गातील महिला व पुरुषांना नगराध्यक्ष होता येणार आहे. दरम्यान, नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांनी लॉबिंग सुरु केले आहे. काँग्रेसकडे सत्ता आली तर खा. रजनी पाटील व माजी मंत्री अशोकराव पाटील ठरवतील त्याला मान मिळेल.
यांच्यापैकी कोण ?
१७ पैकी पाच नगरसेवक ओबीसी मागास प्रवर्गात मोडतात. काँग्रेसकडून कबीरोद्दीन नसिमोद्दीन इनामदार, अश्विनी गाढवे, दीपाली डोंगरे तर भाजपाकडून हारुण इनामदार, रेशमा जलीलोद्दीन इनामदार यांचा समावेश आहे. (वार्ताहर)