पोटनिवडणुकीतही काँग्रेसचे पानिपत
By Admin | Updated: July 1, 2014 01:03 IST2014-07-01T00:38:20+5:302014-07-01T01:03:54+5:30
लातूर : लातूर मनपाच्या प्रभाग क्रमांक १३ अ च्या पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा दणाणून पराभव झाला

पोटनिवडणुकीतही काँग्रेसचे पानिपत
लातूर : लातूर मनपाच्या प्रभाग क्रमांक १३ अ च्या पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा दणाणून पराभव झाला असून, बसपापुरस्कृत व भाजपाच्या पाठिंब्याने डॉ़ विजय अजनीकर १५६ मतांनी विजयी झाले आहेत़ डॉ़ अजनीकर यांना एकूण १४४२ मते पडली आहेत़ तर काँग्रेस उमेदवार प्रफुल्ल कांबळे हे १२८६ मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत़ अन्य दोन अपक्ष उमेदवारांची तर अनामत रक्कमही जप्त झाली आहे़ तर औसा पालिका पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली असून, चाँदबी पटेल या विजयी झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपला गड कायम राखण्यात यशस्वी झाला आहे.
गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक १३ अ मधून अॅड़व्यंकट बेद्रे हे विजयी झाले होते़; परंतु त्यांचे जात प्रमाणपत्र न्यायालयाने अवैध ठरविले़ त्यामुळे ही पोटनिवडणूक लागली होती़ यात भाजप उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने काँग्रेस बरोबर अपक्षांची लढत झाली़ त्यात बसपापुरस्कृत व भाजपा पाठिंब्यावर डॉ़विजय अजनीकर यांनी बाजी मारली असून त्यांना ३१२३ मतांपैकी १४४२ मते पडली आहेत़ त्या खालोखाल काँग्रेस उमेदवार कांबळे यांना १२८६ मते मिळाली असून अपक्ष व शिवसेनेचा पाठिंबा असलेल्या विठ्ठल भोसले यांना २९५ तर शिवप्रसाद श्रृंगारे या अपक्ष उमेदवारास ७६ मते पडली आहेत़ तर २४ मतदारांनी नकारार्थी मतदान केले आहे़ भोसले व शृंगारे यांची अनामत रक्कमही जप्त झाली आहे़ गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत डॉ़विजय अजनीकर यांनी बसपाच्या तिकिटावर या प्रभागातून निवडणूक लढवली होती़ त्यांना ९५० मते मिळाली होती़ या निवडणूकीत त्यांनी बसपापुरस्कृत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आणि भाजपानेही पाठिंबा दिला़ त्यामुळे त्यांच्या विजयाचा मार्ग मोकळा होऊन ते विजयी झाले़
काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ राज्यमंत्री अमित देशमुख यांनी शेवटच्या क्षणी या प्रभागात ६ ते ८ कॉर्नर बैठका घेऊन एक जाहीर सभा घेतली होती़ परंतु, मतदारांनी कौल अपक्ष उमेदवार डॉ़विजय अजनीकर यांच्या बाजूने दिला असून, महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे संख्याबळ ५० वर जाण्याऐवजी ४९ वरच राहिले आहे़ (प्रतिनिधी)
औसा पालिकेत राष्ट्रवादीचा गड कायम
औसा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ५ मधील झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चाँदबी आखलाख पटेल या १६५१ मते घेवून विजयी झाल्या आहेत़ त्यांनी नजीकच्या प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार रजीयाबी नजीरसाब शेख यांचा पराभव केला असून, त्यांनी राष्ट्रवादीचा हा गड कायम ठेवला आहे़ राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुरय्या मुक्तार कुरेशी यांनी राजीनामा दिल्यामुळे ही पोटनिवडणूक लागली होती़ या निवडणुकीत रजीयाबी शेख यांना ६८४, तहसीन असलम पठाण २९९, मेहराजबी शेख १२६ तर मंगलबाई बेवनाळे यांना १४ मते पडली़ ५४ मतदारांनी नकारार्थी मतदान केले असल्याची माहिती सहायक निवडणूक अधिकारी दत्ता भारस्कर यांनी दिली़
सत्ताधारी काँग्रेसचे अर्धशतक हुकले..!
लातूर मनपा प्रभाग क्र. १३ अ ची पोटनिवडणूक काँग्रेस पक्षाने जिंकली असती, तर मनपा सभागृहात काँग्रेसची सदस्य संख्या ५० वर गेली असती. परंतु, पराभव झाल्याने त्यांचे सभागृहातील अर्धशतक हुकले आहे. या निवडणुकीत काँग्रेस नेत्यांकडून सुरुवातीला प्रचार कमी झाला. राज्यमंत्री अमित देशमुख यांनी बैठका आणि सभा घेतल्यानंतरच पक्ष कार्यकर्ते प्रचाराच्या कामाला लागले होते. तोपर्यंत बसपा पुरस्कृत उमेदवार डॉ. विजय अजनीकर यांनी प्रभाग पिंजून काढून मतदारांपर्यंत पोहोचले होते.