बसस्थानकातच रोखल्या संतप्त विद्यार्थिनींनी बसेस
By Admin | Updated: July 8, 2017 00:06 IST2017-07-08T00:03:17+5:302017-07-08T00:06:22+5:30
मानवत : मानवत-पाळोदी रस्त्याचे काम सुरू असल्याच्या कारणावरून महामंडळाने या मार्गावर धावणाऱ्या बसेस बंद केल्याने शालेय विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत

बसस्थानकातच रोखल्या संतप्त विद्यार्थिनींनी बसेस
लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत : मानवत-पाळोदी रस्त्याचे काम सुरू असल्याच्या कारणावरून महामंडळाने या मार्गावर धावणाऱ्या बसेस बंद केल्याने शालेय विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. बस सुरू करण्याच्या मागणीसाठी जवळपास १५० विद्यार्थिनींनी ७ जुलै रोजी दुपारी एकच्या सुमारास मानवत बसस्थानकातील बसेस रोखून धरत संताप व्यक्त केला. या प्रकारामुळे तब्बल अर्धा तास बसेस बसस्थानकातच अडकून पडल्या.
मानवत तालुक्यातील मानवत-पाळोदी या २० कि.मी. रस्त्यावर अर्थसंकल्पातून १४ कि.मी.चे काम मंजूर करण्यात आले आहे. या रस्त्यावरील मंजूर कामांपैकी ८ कि. मी. चे एमपीएमचे काम पूर्ण झाले आहे. तर ६ कि. मी. रस्त्यावरील खड्डे भरण्यात आले आहेत. या रस्त्याचे काम मे महिन्यात सुरू असताना संबंधित ठेकेदारांनी या रस्त्यावरील महामंडळाची वाहतूक बंद करण्याबाबतचे पत्र विभागीय वाहतूक अधिकारी परभणी यांना दिले होते. त्यानंतर या रस्त्यावरील बससेवा बंद करण्यात आली आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने रस्त्याचे काम बंद आहे. १५ जून रोजी शाळा सुरू झाल्याने या रस्त्यावरील हत्तलवाडी, आंबेगाव, सावळी, सावरगाव, बोंदरवाडी, खडकवाडी, पिंपळा, पाळोदी या भागातून शालेय विद्यार्थ्यांना मानवत शहरात येण्यासाठी गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
बससेवा बंद असल्याने खाजगी वाहनाने विद्यार्थ्यांना शाळा गाठावी लागत आहे. पालकांनी एसटी आगाराकडे वारंवार पाठपुरावा करीत बससेवा सुरू करण्याची मागणी केली. मात्र खराब रस्त्याचे कारण देऊन बस सुरू करण्यात आली नाही. ७ जुलै रोजी दुपारी एकच्या सुमारास १५० विद्यार्थिनी व पालकांनी बसस्थानकातच बस रोखून धरीत आंदोलन सुरू केले. बस सुरू करेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतल्यानंतर चांगलीच कोंडी निर्माण झाली. शेवटी बसस्थानकाचे नियंत्रक गवळी यांनी पाथरी आगारप्रमुखांशी संपर्क साधल्यानंतर ९ जुलैपासून बस सुरू करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात युवा सेनेच संतोष जाधव, संदीप जाधव, सतीश काळे, आसाराम शिंदे, गोविंद जाधव यांच्यासह शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते.