शहरात व्यापाऱ्यांनी पहारेकरी नेमावेत..!
By Admin | Updated: January 30, 2016 00:21 IST2016-01-30T00:07:09+5:302016-01-30T00:21:51+5:30
जालना : शहरात चोऱ्यांचे प्रमाण रोखण्यासाठी बीट मार्शल नेमण्यात आलेले आहेत. सकाळी शाळा व बँकाकडे तसेच रात्री शहरात पोलिसांची गस्त सुरु आहे.

शहरात व्यापाऱ्यांनी पहारेकरी नेमावेत..!
जालना : शहरात चोऱ्यांचे प्रमाण रोखण्यासाठी बीट मार्शल नेमण्यात आलेले आहेत. सकाळी शाळा व बँकाकडे तसेच रात्री शहरात पोलिसांची गस्त सुरु आहे. मात्र अधिकाराच्या वादात आपण आपली जबाबदारी आणि कर्तव्यापासून दूर जात आहोत. किती व्यापाऱ्यांनी दुकानांच्या संरक्षणासाठी चौकीदार नेमले, असा सवाल करीत व्यापाऱ्यांनी पाहरेकरी नेमून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक माकणीकर यांनी शुक्रवारी येथे केले.
पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत शुक्रवारी झालेल्या व्यापाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी आपली भूमिका मांडली.
शहरात एकाच रात्री १३ दुकाने फोडण्यात आल्याने व्यापाऱ्यांत घबराटीचे वाताववरण पसरले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी पालकमंत्री लोणीकर यांच्याकडे आपले गाऱ्हाणे मांडून पोलिस प्रशासनाविरूद्ध रोष व्यक्त केला. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेशचंद्र तवरावाला, सतीश पंच, विनीत साहनी, किशोर तिवारी, मेघराज चौधरी, आनंद सुराणा, संजय मुथा, विलास नाईक आदी व्यापाऱ्यांची उपस्थिती होती.
तवरावाला यांनी शहरात एकाच रात्री २५ ते ३० घरफोड्या झाल्या आहेत. दानाबाजार परिसरात पोलिसांची गाडी येत नाही. गणपती विर्सजनाची वाहने या भागातून जातात, मग पोलिसांचे का नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पंच यांनी पोलिसांचा गुन्हेगारांवर जरब राहिला नसल्याने चोऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप करून नवीन मोंढ्यात पोलिस चौकी देण्याची मागणी केली. विनीत साहणी यांनी घरफोड्या पाठोपाठ व्यापाऱ्यांची बँकेची रोकड लुटण्याच्याही २ ते ३ घटना घडलेल्या आहेत. त्याचाही छडा लावण्याची मागणी त्यांनी केली.
यावेळी सहाय्यक पोलिस अधिक्षक दीक्षित गेडाम म्हणाले की, व्यापाऱ्यांनी दुकांनासाठी पहारेकरी नेमावेत, त्यांच्याकडे एक डायरी देवून त्यावर गस्तीवरील कर्मचाऱ्यांच्या सह्या घेवू. काही भागात हा प्रयोग सुरू आहे. सर्वांनी दक्ष राहून पोलिसांना मदत केल्यास हा प्रकार टाळता येवू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या जिल्हा शाखेतर्फे श्ुाक्रवारी पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए.जे. बोराडे, विष्णू पाचफुले, बाला परदेशी, घनशाम खाकीवाले, दुर्गेश काटोटीवाले आदींची उपस्थिती होती. तसेच माजी आ. कैलास गोरंट्याल यांनीही काँग्रेसतर्फे पोलिसांना निवेदन सादर केले.