‘संस्कारा’च्या नावाखाली धंदा !
By Admin | Updated: August 7, 2015 01:14 IST2015-08-07T01:12:25+5:302015-08-07T01:14:54+5:30
लातूर : संस्कार आणि गुरुकुल निवासी केंद्रांच्या नावाखाली खाजगी वसतिगृहांचा व्यवसाय लातूर शहरात तेजीत आहे. गुरुकुल, आदर्श, विद्यानिकेतन, यशोदीप, संस्कार केंद्र अ

‘संस्कारा’च्या नावाखाली धंदा !
लातूर : संस्कार आणि गुरुकुल निवासी केंद्रांच्या नावाखाली खाजगी वसतिगृहांचा व्यवसाय लातूर शहरात तेजीत आहे. गुरुकुल, आदर्श, विद्यानिकेतन, यशोदीप, संस्कार केंद्र अशी आकर्षित करणारी मोठी नावे धारण करून खाजगी वसतिगृहांचा व्यवसाय खुलेआम आहे. त्याला ना कोणाची परवानगी ना त्यावर कोणाचे नियंत्रण. त्यामुळे हा व्यवसाय बिनबोभाट सुरू आहे. शुल्क किती असावे, प्रवेश क्षमता किती असावी, यावर कोणाचेच नियंत्रण या संस्कार केंद्रांच्या वसतिगृहांवर नाही. केवळ अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाच्या परवानगीवर वसतिगृहांच्या या ‘मेस’ आहेत.
धर्मादाय आयुक्त कार्यालयात सेवाभावी संस्थेची नोंदणी करून या नोंदणीवरच संस्कार केंद्रांना लातूर शहरात ऊत आला आहे. शिवाजी चौक ते बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयापर्यंतच्या परिसरात २५ ते ३० निवासी संस्कार केंद्र आहेत. हे संस्कार केंद्र कसले, ते वसतिगृहच आहेत. या संस्कार केंद्रांमध्ये पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. निवास व भोजनासाठी प्रवेश दिलेल्या संस्कार केंद्रांकडून १० ते २५ हजारांपर्यंतचे शुल्क एका विद्यार्थ्यासाठी घेतले जाते. संस्कार केंद्राच्या नजिक असलेल्या किंंवा केंद्राच्या हितसंबंधी शाळांत त्यांना प्रवेश दिला जातो. निवासी संस्कार केंद्रांचे आणि शाळांचे एक प्रकारे साटेलोटेच आहे. संस्कार केंद्रांच्या नावाखाली वसतिगृह असल्यामुळे ग्रामीण भागातील पालक त्याकडे आकर्षित होत आहेत. परंतु, त्यातून पालकांची लूटच होत आहे. शिवाय, प्रवेश देताना वेगवेगळ्या सुविधा देण्याचे आश्वासन पालकांना दिले जाते. क्रीडांगण, आरोग्याची सुविधा, अत्याधुनिक अभ्यासिका, शिकवणी वर्ग आणि उत्कृष्ट भोजन अशी अनेक प्रलोभने दाखवून प्रवेश दिला जातो. मात्र निवास आणि भोजन वगळता अन्य सुविधा कोणत्याही संस्कार केंद्रांत नाहीत. रेणापूर नाका ते शिवाजी चौक परिसरातही १७ ते २० संस्कार केंद्रांची वसतिगृहे आहेत. गावभागातील मोठ मोठ्या शाळांच्या परिसरात या संस्कार केंद्रांना ऊत आला आहे. एकट्या लातूर शहरात ५५ ते ६५ निवासी संस्कार केंद्र आहेत. या संस्कार केंद्रांवर महिला व बालकल्याण विभाग, शिक्षण विभाग, समाजकल्याण विभाग, मनपा शिक्षण विभाग यापैकी कोणत्याही यंत्रणेचे याकडे लक्ष नाही किंवा यापैकी कोणत्याही यंत्रणेकडून निवासी संस्कार केंद्रांनी रितसर परवानगी घेतलेली नाही.
खाद्य पदार्थ तयार करून विक्री करण्याचा परवाना खानावळ म्हणून या संस्कार केंद्रांकडे आहे. लातूर शहरात जवळपास ६३ लोकांनी असा परवाना अन्न व भेसळ प्रतिबंधक कार्यालयाकडून घेतला आहे. खाद्यपदार्थ तयार करून विक्रीसाठी घेतलेली ही ६३ परवाने संस्कार केंद्रांचीच आहेत, असे अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाचे सहाय्यक आयुक्त भुजबळ यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांचा खोलीत गुदमरतोय जीव...
४भाड्याने अथवा स्वत:च्या इमारतीत असलेल्या एका संस्कार केंद्रामध्ये किमान ८० ते १०० विद्यार्थी आहेत. एका खोलीत १० ते १५ विद्यार्थ्यांच्या निवास व भोजनाची सोय आहे. ना तेथे क्रीडांगण ना अभ्यासिका, अशीच अवस्था बहुतांश संस्कार निवासी केंद्रांची आहे.
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण तसेच महिला व बालकल्याण विभागाच्या वतीनेही खाजगी संस्कार केंद्रांच्या वसतिगृहांना परवानगी दिली जात नाही. वास्तविक पाहता परवानगीची अट असायलाच हवी. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याणच्या अनुदानावर अपंग, मूकबधीर व बहुविकलांगच्या निवासी शाळा आहेत. त्यांची रितसर परवानगी असते. आमचे वसतिगृहही आहेत. परंतु, खाजगी संस्कार केंद्रांच्या वसतिगृहासाठी आमच्या परवानगीची अट नाही, असे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महेशकुमार मेघमाळे, महिला व बालकल्याण अधिकारी कांगणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.