बसचालकांना ‘सेम्युलेटर ट्रेनिंग’
By Admin | Updated: January 5, 2015 00:37 IST2015-01-05T00:24:45+5:302015-01-05T00:37:16+5:30
बाळासाहेब जाधव , लातूर गेल्या दोन महिन्यात मरणांतक अपघात झालेल्या बस चालकांकडून भविष्यात विनाअपघात प्रवाशांना सेवा मिळावी, म्हणून मुंबई येथे सेम्युलेटर ट्रेनिंग देण्यात येणार असून,

बसचालकांना ‘सेम्युलेटर ट्रेनिंग’
बाळासाहेब जाधव , लातूर
गेल्या दोन महिन्यात मरणांतक अपघात झालेल्या बस चालकांकडून भविष्यात विनाअपघात प्रवाशांना सेवा मिळावी, म्हणून मुंबई येथे सेम्युलेटर ट्रेनिंग देण्यात येणार असून, यासाठी लातूरच्या ८ बस चालकांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी विनाअपघात सुरक्षीत प्रवास ही मोहीम सुरु केली आहे़ या मोहिमेअंतर्गत गेल्या दोन महिन्यात चालकाकडून मरणांतक अपघात झालेले आहेत़ अशा चालकांकडून पुन्हा असे अपघात होऊ नये, ही भूमिका लक्षात घेऊन शासनाच्या आदेशानुसार भविष्यात असे गंभीर अपघात टाळण्यासाठी लातूर विभागातील औसा आगारातून २, निलंगा-२, लातूर-३, अहमदपूर-१ अशा ८ कर्मचाऱ्यांना ७ दिवसाचे पुणे भोसरी येथील प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर एक दिवसाचे सेम्युलेटर ट्रेनिंग देण्याचा निर्णय लातूर विभागीय कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेला आहे़ विनाअपघात सुरक्षीत प्रवास मोहिमेअंतर्गत चालकांची नेत्र तपासणी, चालकाकडून विनाअपघात सुरक्षीत प्रवास देण्याबाबत प्रतिज्ञापत्र भरुन घेणे, चालकांना प्रशिक्षण अशा विविध उपक्रमांबरोबर कायमस्वरुपी विनाअपघात प्रवासी सेवा देण्यासाठी चालू वर्षामध्ये सेम्युलेटर ट्रेनिंग हा उपक्रम सुरु केला आहे़ तसेच या मोहिमेचा भाग म्हणून लातूर विभागातील ५ डेपोच्या २० चालकांना विशेष ट्रेनिंग देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे़ लातूर विभागीय कार्यालयाच्या वतीने दरवर्षी विनाअपघात २६० दिवस प्रवाशी सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सत्कार करण्यात आला़ या मोहिमेला गती मिळावी, या भूमिकेतून विना अपघात सेवेसाठी पुण्याच्या प्रशिक्षणानंतर मुंबईला ट्रेनिंग देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ त्यामुळे एसटी महामंडळाच्या चालक-कर्मचाऱ्यांतून या उपक्रमाचे कौतुक होत आहे़
लातूर विभागीय कार्यालयाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी २६० दिवस विनाअपघात प्रवासी सेवा देणाऱ्या चालकांचा विभाग नियंत्रकांच्या हस्ते सत्कार करण्यात येतो़ या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या हातून भविष्यातही विनाअपघात सेवा घडावी, या दृष्टीकोनातून प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जातो़
लातूर विभागीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या औसा, निलंगा, लातूर, अहमदपूर, उदगीर या आगाराअंतर्गत १० जानेवारीच्या कालावधीत नेत्र तपासणी, प्रवाशांना सुरक्षीत सेवेबद्दल विश्वास निर्माण व्हावा, यासाठी चालकांकडून प्रतिज्ञापत्र भरून घेण्याचाही उपक्रम हाती घेण्यात आला आहे़