तळीराम चालकामुळे प्रवाशांनी थांबविली बस
By Admin | Updated: September 11, 2014 01:06 IST2014-09-11T00:32:53+5:302014-09-11T01:06:14+5:30
उस्मानाबाद : तळीराम चालकाने कट मारल्याने दुचाकीस्वार युवकांनी पाठलाग करून केलेली पाहणी आणि चालकाचे वर्तन यामुळे प्रवाशांनी सारोळा (ता़उस्मानाबाद) नजीक बस थांबविली़

तळीराम चालकामुळे प्रवाशांनी थांबविली बस
उस्मानाबाद : तळीराम चालकाने कट मारल्याने दुचाकीस्वार युवकांनी पाठलाग करून केलेली पाहणी आणि चालकाचे वर्तन यामुळे प्रवाशांनी सारोळा (ता़उस्मानाबाद) नजीक बस थांबविली़ उस्मानाबाद आगरातून दुसरा चालक आल्यानंतर ही बस मार्गस्थ झाली़ हा प्रकार मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडला़
मिळालेल्या माहितीनुसार, उस्मानाबाद आगारातून औसाकडे जाणारी बस मंगळवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास बसस्थानकातून मार्गस्थ झाली़ सांजा गावाकडे वाहकाने बेल मारल्यानंतर चालकाने जोरात ब्रेक मारले़ यामुळे आतील प्रवाशांना हेलकावा खावा लागला़ तसेच समोरून येणाऱ्या वाहनांना चालक कट मारत असल्याचे काही प्रवाशांच्या लक्षात आले़
यादरम्यान, सुतमिलजवळही बसचालकाने एका दुचाकीस जोराची कट मारली़ त्यानंतर दुचाकीस्वारांनी सारोळा गावापर्यंत बसचा पाठलाग करून ती थांबविली़ त्यावेळी आतील प्रवाशांनीही चालक मद्यधुंद असल्याची ओरड करीत बस थांबविण्यात आली़ घडला प्रकार राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवन गोरे यांचे स्वीय सहाय्यक सावंत यांना देण्यात आली़ त्यांनी तातडीने उस्मानाबाद आगारात माहिती देवून दुसरा चालक पाठविण्याच्या सूचना दिल्या़ सायंकाळी कोंडकडे जाणाऱ्या बसमध्ये दुसरा चालक घटनास्थळी दाखल झाला़ दुसरा चालक आल्यानंतरच प्रवाशांनी औसा बस पुढे जावू दिली़ (प्रतिनिधी)
उस्मानाबाद-औसा बसचा चालक मद्यधूंद असल्याचा आरोप प्रवाशांनी केल्यामुळे दुसरा चालक पाठविण्यात आला आहे़ संबंधित चालकाला सोबत घेवून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी दुसरे पथक पाठविण्यात आले आहे़ वैद्यकीय तपासणीत तथ्यता आढळून आल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे आगारप्रमुख जगताप यांनी सांगितले़